बीडमधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी कारवाईला वेग आला आहे. संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील चारही आरोपींची बँक खाती गोठवण्यात आली आहेत. यात वाल्मिक कराडच्या बँक खात्यांचाही समावेश आहे. खंडणी आणि हत्या प्रकरणी पोलिसांची पथके आऱोपींच्या शोधासाठी रवाना झाली आहेत. वाल्मिक कराडच्या पत्नीचीही पोलिसांनी चौकशी केल्याची माहिती सूत्रांनी दिलीय.
संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींच्या ठशांचे निशाणही जुळल्याची माहिती समजते. या प्रकरणातील फरार आरोपींच्या शोधासाठी सीआयडीची ९ पथके कार्यरत आहेत. या पथकांमध्ये जवळपास दीडशे अधिकारी आणि कर्मचारी आहेत. वाल्मिक कराड भोवतीचा फास आवळत चालला आहे. त्याचा तपास केला जात असला तरी त्याला अटक कधी करणार असा प्रश्न विचारला जात आहे.
स्कॉर्पिओ गाडीत दोन मोबाईल फोन मिळाले. यात मारहाणीचे व्हिडीओ आढळले आहेत. याशिवाय मोबाईलवरून बड्या नेत्याला फोन केल्याचंही समजते. सीआयडीच्या हाती मोठे पुरावे लागले आहेत. गुन्ह्यात वापरलेली स्कॉर्पिओ गाडी जप्त करण्यात आली आहे. याच गाडीत दोन फोन सापडले आहेत. या फोनमधील डेटा रिकव्हर करण्यात येत आहे.
सीआयडीने वेगाने तपास करण्यास सुरुवात केलीय. खंडणी आणि खून प्रकरणातील आरोपींचा शोध घेतला जात आहे. महाराष्ट्रासह देशभरात हा तपास केला जातोय. खंडणी आणि खून प्रकरणातील चार आरोपींची खाती गोठवली आहेत. यामुळे आरोपी एक ते दोन दिवसात शरण येतील अशीही माहिती समजते.
संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींच्या पासपोर्टची माहितीसुद्धा मिळवण्यात आली आहे. संतोष देशमुख यांना चार वेगवेगळ्या ठिकाणी नेऊन मारहाण करण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे. चार आरोपींच्या शोधासाठी पथके रवाना झाली असताना वाल्मिक कराड याच्या पत्नीची चौकशी केली. काही नेत्यांची आणि पदाधिकाऱ्यांचीही चौकशी केली गेली.