“मुख्यमंत्रीसाहेब नंतर पश्चात्ताप होईल…”; संतोष देशमुख हत्या प्रकरणावरून जरांगे पाटलांचा फडणवीसांना इशारा

0

मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील मुख्य आरोपींना अजून पकडण्यात आलेलं नाही. शिवाय या प्रकरणाचा सुत्रधार म्हणून विरोधक वाल्मिक कराड याच नाव घेत आहेत. तो देखील अद्याप फरार आहे. याच सर्व पार्श्वभूमीवर आरोपींना अटक न केल्याचा निषेध करण्यासाठी आणि संतोष देशमुख यांना न्याय मिळवून देण्यासाठी आज बीडमध्ये मूक मोर्चा काढण्यात येणार आहे.

या मोर्चात आमदार सुरेश धस, संदीप क्षीरसागर, प्रकाश सोळंके, खासदार बजरंग सोनावणे यांच्यासह मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील देखील सहभागी होणार आहेत. तर या मोर्चाला सुरूवात होण्याआधीच जरांगे पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आरोपींना पाठिशी घालणाऱ्यांना पाठी घालू नका अन्यथा पश्चात्ताप होईल, असा इशारा दिला आहे.

अधिक वाचा  कोथरूड वाढत्या गुन्हेगारीस आळा घालून गतवैभव पुन्हा प्राप्त करून द्या; राष्ट्रवादी तर्फे  कोथरूड पोलिसांना यांना निवेदन

माध्यमांशी बोलताना जरांगे पाटील म्हणाले, “घटना घडून इतके दिवस झाले आरोपीला पकडलं जात नाही. आरोपीला वाचवणारे तुमच्या मंत्रिमंडळात आहेत. खरंतर आरोपींना वाचवणाऱ्यांना तुम्ही सज्जड दम दिला पाहिजे. संध्याकाळपर्यंत आरोपी हजर झाले पाहिजे. नाही तर तुझी खैर नाही, असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं पाहिजे. मात्र ते तसं करत नाहीत. देशमुख यांचा खून झाला. त्याचं कुणाला काही पडलेलं नाही.

तुमच्या जवळच्या व्यक्तीचा खून झाला असता तर तुम्हाला झोप लागली असती का? मग तुम्हाला देशमुख यांच्या पत्नीचा, लेकीचा आईचा भयंकर आक्रोश ऐकू का येत नाही? असा सवाल करत फडणवीसांवर निशाणा साधला. तसंच तुम्ही आरोपींना पकडत नाही तर वातावरण शांत होण्याची वाट पाहात आहात. तुम्हीच आरोपींना पकडून ठेवलं की काय असं वाटतं आहे.

अधिक वाचा  जैन बोर्डिंग होस्टेल व्यवहाराशी माझा काही संबंध नाही! माहिती न घेता चुकीचे आरोप मोहोळांचा कागदपत्रांसह खुलासा

पण आम्ही वातावरण थंड होऊ देणार नाही. हे वातावरण आता राज्यभर पसरेल. प्रत्येक जिल्ह्यातून मोर्चे काढणार असल्याचंही जरांगे म्हणाले. बीडमध्ये गुन्हेगारी प्रचंड प्रमाणात वाढली आहे. या गुन्हेगारांचा बिमोड करायचं काम तुमचं आहे. पण तुम्हीच त्यांना सांभाळताना दिसत आहात. मुख्यमंत्री साहेब तुम्ही या लोकांना सांभाळू नका, पाठीशी घालू नका. नाही तर तुम्हाला नंतर पश्चात्ताप होईल, अशा शब्दात जरांगेंनी फडणवीसांना इशारा दिला.