महाराष्ट्रात मोदी – शाह यांचं पुन्हा धक्कातंत्र; प्रदेशाध्यक्षपदी ‘या’ नेत्याचं नाव ठरलंही? शाह, नड्डा करणार नावाची घोषणा

0

महाराष्ट्रात तब्बल 132 जागा जिंकत भाजपनं अभूतपूर्व यश मिळवलं. इतकं मोठं यश मिळाल्यानंतर आता भाजपमध्ये मोठ्या संघटनात्मक बदलाचं वारं वाहू लागलं आहे. पुढच्या महिन्यांत शिर्डीत होत असलेल्या राष्ट्रीय अधिवेशनात राष्ट्रीय अध्यक्ष, प्रदेशाध्यक्षपदाबाबतही मोठा निर्णय होण्याची शक्यता आहे. राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी एकीकडे विनोद तावडे यांचं नाव आघाडीवर असताना मात्र, चंद्रशेखर बावनकुळेंनंतर प्रदेशाध्यक्षपदासाठी इच्छुकांची संख्या जास्त आहे. अशातच महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदाबाबत मोठी अपडेट समोर आली आहे.

मंत्रिपदासाठी दिग्गज नेत्यांचा पत्ता कट झाल्यामुळे या नाराज नेत्यांचं पुनर्वसन करतानाच त्यांच्यापैकी कुणाला संधी द्यायची की धक्कातंत्र वापरत नव्या चेहर्‍याकडे नेतृत्वाची कमान द्यावी असा पेच भाजप पक्षश्रेष्ठींसमोर पेच निर्माण झाला होता. याचदरम्यान,प्रदेशाध्यक्षपदासाठीचा चंद्रशेखर बावनकुळेंच्या पुढचा वारसदार जवळपास निश्चित झाल्याचं बोललं जात आहे.

भाजपा प्रदेशाध्यक्षपदी रवींद्र चव्हाण यांचे नाव जवळपास निश्चित झाल्याची विश्वसनीय माहिती समोर येत आहे. जानेवारी महिन्यात शिर्डीला होत असलेल्या भाजपच्या राष्ट्रीय अधिवेशनात रवींद्र चव्हाण यांच्या नावाची एकमताने घोषणा होण्याची शक्यता आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा यांच्या उपस्थितीत ही घोषणा केली जाणार आहे.

अधिक वाचा  भाजपचा महाराष्ट्रभर झंझावात; पण येथे अख्ख्या पॅनलचं डिपॉझिट जप्त; पक्षाचा आलेला निधी देखील तळापर्यंत गेलाच नाही; प्रदेश पातळीवर मोठी खलबते होणार 

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा मंत्रिमंडळात समावेश झाला आहे. भाजपमध्ये ‘एक व्यक्ती एक पद’, असा नियम आहे. त्यानुसार बावनकुळे यांच्याकडे असलेले प्रदेशाध्यक्षपदी कोणाला संधी मिळणार, याची चर्चा आहे. मंत्रिमंडळाच्या विस्तारात अनेक अनुभवी आणि ज्येष्ठांना डावलण्यात आले आहे. त्यामुळे प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी अनुभवी ज्येष्ठाकडे देण्याची तयारी भाजपने केल्याचे बोलले जात आहे.

चंद्रशेखर बावनकुळे यांना मंत्रिपदाची संधी देण्यात आल्याने आता भाजपचे नवे प्रदेशाध्यक्ष कोण असणार याविषयी तर्कवितर्क लढवले जात आहे. यात मंत्रिपदाची संधी मिळू न शकलेले सुधीर मुनगंटीवार, रवींद्र चव्हाण, डॉ.संजय कुटे यांची नावे प्रदेशाध्यक्षपदाच्या शर्यतीत आहे. त्यात रवींद्र चव्हाण यांचे नाव प्रदेशाध्यक्षपदासाठी सर्वाधिक चर्चेत आहे.

अधिक वाचा  ….वारजे बदलतंय! केंद्रीय मंत्री ‘ॲक्टिव्ह’ पारंपारिक कट्टर विरोधक एकत्र विसावले!; सर्वांची गणिते बिघडली!

तत्कालीन एकनाथ शिंदे सरकारमध्ये ते सार्वजनिक बांधकाम मंत्री होते. कोकणात भाजपला मोठे यश मिळाले आहे. या यशात त्यांचा मोठा वाटा असल्याचे मानले जाते. रवींद्र चव्हाण हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्ती आहे. प्रदेशाध्यक्षपद मराठा समाजाला द्यायचे ठरले तर चव्हाण यांच्या नावाला पसंती दिली जाण्याची शक्यता आहे.

याचवेळी जळगावमधील जामोदचे पाचवेळा आमदार राहिलेले डॉ. संजय कुटे यांचे नाव प्रदेशाध्यक्षपदासाठी देखील चर्चेत आले आहे. ते फडणवीस यांचे अत्यंत निकटवर्ती मानले जातात. ते बहुजनांचे नेतृत्व करत असून कुणबी समाजाचे आहेत. चंद्रशेखर बावनकुळे हे तेली समाजाचे आहेत. बावनकुळे यांच्या जागी बहुजन समाजाला संधी देण्याचा निर्णय झाल्यास कुटे यांना संधी मिळू शकते, असे सांगितले जात आहे.

अधिक वाचा  मोठा ट्विस्ट! दोन्ही राष्ट्रवादींच्या बैठकीतील इनसाईड स्टोरी, अजित पवारांचा प्रस्ताव शरद पवार मान्य करणार?

भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांचा मंत्रिमंडळात संधी मिळालेली नाही. त्यांचे पुनर्वसन कसे होणार, यावर देखील भाजप विचार करत असून, मुनगंटीवार यांचे कार्यकर्ते देखील उत्सुक आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकींनिमित्ताने सुधीर मुनगंटीवार यांच्यावर मोठी जबाबदारी पक्षाकडून दिली जाणार असल्याची चर्चा आहे.

…असाही निर्णय होऊ शकतो!

भाजपचे प्रदेशाध्यक्षपदासाठी चंद्रशेखर बावनकुळे यांच्या जागी नवीन चेहरा देण्याच्या पक्षाकडून जोरदार हालचाली सुरू आहेत.मात्र, जे.पी.नड्डा यांचा केंद्रीय मंत्रिमंडळात समावेश असून देखील त्यांच्याकडेच भाजपचे राष्ट्रीय अध्यक्षपद आहे. तोच फॉर्म्युला महाराष्ट्रात कायम ठेवायचा की नवा चेहरा द्यायचा याविषयी दोन मतप्रवाह भाजपच्या गोटात सुरू आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीपर्यंत बावनकुळे हे प्रदेशाध्यक्षपदी कायम राहण्याची शक्यता वर्तवली जात आहे.