बीड जिल्ह्यासह सगळ्या राज्याला सरपंच संतोष देशमुख हत्याकांडाने हादरवून सोडले. मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणावर भाजप नेत्या आणि पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी अखेर मौन सोडले आहे. या प्रकरणी पंकजा यांनी भाष्य केले आहे. पंकजा मुंडे या कोल्हापूर दौऱ्यावर आल्या आहेत. या दरम्यान त्यांनी अंबाबाईचे दर्शन घेतले. त्यानंतर माध्यमांशी संवाद साधताना पंकजा यांनी विविध प्रश्नांची उत्तरे दिली.






बीडमधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येने जिल्हाच नव्हे तर सगळं राज्य ढवळून निघाले आहे. संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील प्रमुख आरोपी अजूनही फरार आहेत. या प्रकरणातील सगळे आरोपी आणि मास्टरमाईंड अटकेत नसल्याचे संताप व्यक्त केला जात आहे.
पंकजा मुंडे यांनी काय म्हटले?
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येने राज्यात एकच खळबळ उडाली. पंकजा मुंडे यांना संतोष देशमुख हत्याकांडाबाबत विचारले असता त्यांनी म्हटले की, संतोष देशमुख हा माझा बुथप्रमुख होता. माझ्या निवडणुकीत त्याने काम केले आहे. गोपीनाथ मुंडे यांच्या जयंती दिनी गोपीनाथ गडावरून एसआयटी चौकशीची पहिली मागणी मीच केली होती. या क्रूर प्रकरणाविषयी मी तीव्र संताप व्यक्त केला आहे, असे पंकजा मुंडे यांनी सांगितले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेच गृहमंत्री आहेत. त्यामुळे माझ्या लेकराला न्याय मिळेल असा विश्वासही पंकजा मुंडे यांनी व्यक्त केला.
संतोष देशमुख प्रकरणातील तिन्ही गुन्हे सीआयडीकडे…
केज तालुक्यातील मस्साजोग सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण, खंडणी आणि सुरक्षा रक्षकाला मारहाण हे तिन्ही गुन्हे आता गुन्हे अन्वेषण विभागाकडे (सीआयडी) वर्ग करण्यात आले आहेत. त्यामुळे या प्रकरणातून बीड पोलिसांचा रोल संपला आहे, असे असले तरी मुख्य आरोपी अद्याप मोकाटच असल्याने संताप व्यक्त आहे. दरम्यान, सीआयडीचे वरिष्ठ पोलीस अधिकारी बीडमध्ये दाखल झाले आहेत. सीआयडीचे अप्पर पोलीस महासंचालक प्रशांत बुर्डे हे देशमुख कुटुंबीयांची भेट घेणार आहेत. त्याशिवाय, प्रत्यक्ष घटनास्थळावर जाऊन पाहणी करणार आहेत.










