महायुती सरकारचे राज्यातील खातेवाटप नुकतंच जाहीर झालं असून अनेक बड्या नेत्यांचं डिमोशन करण्यात आलंय तर काही नव्या चेहऱ्याना महत्वाच्या खात्यांची लॉटरी लागली आहे. यामध्ये सातारा जिल्ह्यात महायुतीच्या आमदारांपैकी शिवेंद्रराजे भोसले, जयकुमार गोरे, शंभूराज देसाई, मकरंद पाटील यांना चांगली खाती देण्यात आली आहेत. मात्र, या सगळ्यात आश्चर्याचा धक्का बसला आहे तो जयकुमार गोरे यांना मिळालेल्या खात्याचा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विश्वासू अशी ओळख असलेल्या साताऱ्यातील माण-खटावचे आमदार जयकुमार गोरे याना ग्रामविकास मंत्रिपदा सारख अतिशय महत्वाचं खाते देऊन फडणवीसांनी मोठा मास्टरस्ट्रोक खेळला आहे.
ग्रामीण भागाशी नाळ जोडणाऱ्या ग्रामविकास खात्याच्या माध्यमातून थेट शरद पवारांना शह देण्यासाठीच जयकुमार गोरे या कट्टर पवार विरोधकाची निवड फडणवीसांनी केली आहे. ग्रामविकास खातं जयकुमार गोरेंना देऊन फडणवीसांनी पवारांच्या मुख्य राजकारणावरच घाव घातला आहे. आजही शरद पवार यांच्या राष्ट्रवादीची सोलापूर आणि सातारा जिल्ह्यामध्ये आमदारांची संख्या लक्षात घेता पवारांच्या राजकारणावरच घाव घालत देवेंद्र फडणवीसांनी या रांगड्या पहिलवानाकडे ग्रामविकास खाते दिले आहेत परंतु आत्ता सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री वर्णी लावून पुन्हा मोठा डाव आखत आहे अशी चर्चा सुरू झाली आहे.
जयकुमार गोरे यांच्या राजकारणाबाबत सांगायचे झाल्यास, शरद पवारांना तीव्र विरोध करणारे जे कोणी मोजकी नेतेमंडळी महाराष्ट्रात आहेत त्यात जयकुमार गोरे यांचं नाव आवर्जून घ्यावं लागतं. सातारा या शरद पवारांच्या बालेकिल्ल्यात त्यांना नडणारा पहिला पहिलवान कोण असेल तर हेच जयकुमार गोरे होय. तब्बल ४ वेळा माण- खटाव सारख्या साताऱ्यातील दुष्काळी भागाचे प्रतिनिधित्व केलेल्या जयकुमार गोरे यांचा राजकीय प्रवास अपक्ष – काँग्रेस आणि भाजप असा राहिला आहे. मतदारसंघात त्यांचं एकहाती वजन आहे.
शरद पवारांचा बालेकिल्ला असलेल्या सातारा जिल्ह्यात महायुतीने तब्बल ४ कॅबिनेट मंत्रीपदे वाटली आहेत. त्यात आता जयकुमार गोरे यांच्या ग्रामविकास खात्याची जबाबदारी देऊन शरद पवारांच्या राजकारणाचा बेसच उलथवून टाकण्याचा प्लॅन फडणवीसांनी आखला आहे.
जयाभाऊंना दिलेल्या ग्रामविकास खात्याचे महत्व काय आहे?
ग्रामविकास खाते हे अत्यंत महत्वाचे खाते आहे. नावाप्रमाणेच ग्रामविकास म्हणजे गावांचा विकास करणार असं हे खातं आहे. ग्रामीण भागाच्या सर्वांगिण विकासासाठी महाराष्ट्र शासनाचा ग्रामविकास विभाग कार्यरत असतो. गावामध्ये पायाभूत सुविधा पुरवणे, ग्रामीण क्षेत्राशी निगडीत कायदे करणे हे या विभागाचे मुख्य काम आहे. ग्रांमीण भागातील सर्व ग्रामपंचायत, पंचायत समिती व जिल्हा परिषद यांच्याशी समन्वय साधून सर्व शासन सुविधा व शासन निर्णय ची अंमलबजावणी करणेचे काम ह्या विभागामार्फत केले जाते. त्यामुळे थेट तळागाळापर्यंत पक्षाला पोचता येत… ग्रामीण लोकांची मने जाणून घेता येतात. ग्रामीण भागातील जनतेशी थेट संपर्क येतो. त्यामुळे प्रत्येक पक्षाला वाटत कि ग्रामविकास खाते हे आपल्याकडेच असायला हवं.
जयाभाऊंना ग्रामविकास खाते देऊन भाजपने शरद पवारांना कसा शह दिलाय?
जयकुमार गोरे हे शरद पवारांचे कट्टर विरोधक मानले जातात. सातारा या राष्ट्रवादी काँग्रेसच्या बालेकिल्ल्याला खिंडार पाडण्यात जयकुमार गोरे यांचा सिंहाचा वाटा राहिला आहे. आक्रमक स्वभावाच्या गोरेंनी पाणी प्रश्न किंवा अन्य कोणत्याही मुद्द्यांवरून राष्ट्रवादी काँग्रेसला टार्गेट करत आपलं राजकारण केल आहे. शरद पवारांच्या राजकारणाबाबत सांगायचं झाल्यास, त्यांच्या संपूर्ण राजकारणाची मदारच मुळात ग्रामीण भागावर राहिली आहे. महाराष्ट्राच्या शहरी भागापेक्षा ग्रामीण भागात शरद पवार आणि त्यांच्या पक्षाला मानणारा मोठा गट आहे.
ग्रामविकासाच्या माध्यमातून भाजपची ग्रामीण भागातील तयारी
राज्यात सत्ता असताना शरद पवारांनी ग्रामविकास खाते हे सातत्याने स्वतःच्या पक्षाकडे ठेवलं. या खात्याच्या माध्यमातून शरद पवारांनी महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात आपला पक्ष चांगलाच वाढवला. थेट ग्रामीण भागाशी संपर्क राहिल्याने ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषदेवर शरद पवारांच्या पक्षाचा होल्ड बसला. लोकांची कामे होऊ लागली आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष तळागाळापर्यंत पोचला. आता हेच काम भाजपला करायचं आहे.
साताऱ्याच्या मातीतल्या रांगड्या पहिलवानाला ग्रामविकास खात्याची जबाबदारी देऊन मोठा डाव
भारतीय जनता पक्षानेही सुद्धा मागच्या १० वर्षात ग्रामीण भागात शिरकाव केला आहार. अनेक ग्रामपंचायती ताब्यात घेतल्यात. मात्र, ग्रामीण महाराष्ट्रातील एकगट्टा मतदान पक्षाला कधीच मिळालं नाही. काही अपवाद वगळता ग्रामीण भागातील मतदार हा इकडे- तिकडे जाताना दिसला. शहरी पट्ट्यात भाजपला जितकं भरघोस मतदान होत, तोच जोर ग्रामीण भागात म्हणावा तसा दिसला नाही. मात्र आता मुख्यमंत्री आपल्या पक्षाचा झाल्यानंतर आणि अनेक वजनदार खाती पदरात पाडून घेतल्यानंतर आगामी निवडणुकांच्या तोंडावर ग्रामीण भागात पक्ष आणखी बळकट करण्याचा स्कोप भाजपला आहे. त्यातच साताऱ्याच्या मातीतल्या रांगड्या पहिलवानाकडे ग्रामविकास खात्याची जबाबदारी देऊन भाजपने मोठा डाव खेळला आहे.