यंदाची महाराष्ट्र विधानसभा निवडणूक अनेकार्थाने विशेष, वैशिष्ट्यपूर्ण आणि वेगळी ठरली. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात अभूतपूर्व, ऐतिहासिक फूट पडल्यानंतरची ही पहिली निवडणूक होती. त्यामुळे कोण बाजी मारणार, कोणत्या पक्षाचे किती आमदार निवडणून येणार, लोकसभा निवडणूक निकालाची पुनरावृत्ती महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत दिसणार की, महायुती करेक्ट कार्यक्रम करणार, असे एक ना अनेक प्रश्न राजकीय वर्तुळात आणि मतदारांच्या मनात होते.
विधानसभा निवडणुकीचा निकाल लागताच केवळ राज्यात नव्हे, तर राष्ट्रीय पातळीवरील राजकीय तज्ज्ञांना जोर का धक्का लागला. महायुतीने अभूतपूर्व यश मिळवत महाविकास आघाडीचा न भूतो असा पराभव केला. महायुतीत भाजपा १३२ जागा मिळवत एक नंबरचा पक्ष ठरला. तर शिवसेना शिंदे गटाला ५७ आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला ४१ जागांवर विजय मिळाला. तर महाविकास आघाडीतील एकाही पक्षाला किमान विधानसभेत विरोधी पक्षनेता निवडता येईल, इतक्याही जागा प्राप्त करता आल्या नाहीत.
यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाची, एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्रीपदाची आणि अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर विधिमंडळाचे विशेष अधिवेशन बोलावून नवनिर्वाचित आमदारांना शपथबद्ध करण्यात आले. यानंतर विधानसभा अध्यक्ष म्हणून राहुल नार्वेकर यांनी बिनविरोध निवड करण्यात आली. या घडामोडींमध्ये विधानसभेत सर्वाधिक वेळा निवडून आलेले आमदार कोण? यासंदर्भात महत्त्वाची माहिती समोर आली आहे.
सर्वाधिक वेळा निवडून आलेले ३ राष्ट्रवादी अन् १ भाजपाचा आमदार-
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीनंतर अनेक विक्रम प्रस्थापित झाल्याचे पाहायला मिळाले. न भूतो आणि ऐतिहासिक अशा अनेक गोष्टी घडल्या. यातच अनेक नेत्यांनी आमदारकीचे नवे विक्रम प्रस्थापित केले.
• विधानसभा सभागृहात तब्बल आठ वेळा प्रतिनिधीत्व करायला मिळालेल्यांच्या यादीत उपमुख्यमंत्री अजित पवार, दिलीप वळसे पाटील, जयंत पाटील आणि कालिदास कोळंबकर यांची नावे आहेत.
• सात वेळा आमदार झालेल्यांच्या यादीत गिरीश महाजन, मंगलप्रभात लोढा, राधाकृष्ण विखे-पाटील, सुधीर मुनगंटीवार, प्रकाश भारसाकळे, छगन भुजबळ, दिलीप सोपल, विजयकुमार गावित यांचा समावेश झालेला आहे.
• सहावेळा आमदार होण्याचा बहुमान देवेंद्र फडणवीस, गणेश नाईक, चैनसुख संचेती, भास्कर जाधव, शिवाजी कर्डिले, हसन मुश्रीफ यांना मिळालेला आहे.