राज्यात सरकार स्थापन झाल्यानंतर विशेष अधिवेशनही झालं. तरी अद्याप मंत्रिमंडळाचे खातेवाटप झालेलं नाही. खातेवाटपाच्या चर्चेसाठी महायुती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे दिल्लीला गेले होते. केंद्रीय गहमंत्री अमित शहा आणि भाजपाध्यक्ष जेपी नड्डा यांच्यासोबत दोघांचीही बैठक झाली. या बैठकीत खातेवाटप फॉर्म्युला ठरला आहे.






राज्यात मंत्रिमंडळ खातेवाटपाचा तिढा आता सुटण्याची चिन्हे दिसत आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मंत्रिपदाच्या वाटपावर आता एकमत झाले असून फॉर्म्युला निश्चित झाला आहे. तिन्ही नेत्यांनी मिळून हा फॉर्म्युला ठरवला असून यानुसारच खातेवाटप होणार आहे.
महायुतीच्या खातेवाटपाचा फॉर्म्युला काल रात्री झालेल्या बैठकीत निश्चीत झाला आहे. यात भाजपला जवळपास २० मंत्रीपदं मिळण्याची शक्यता आहे. तर, एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला १३ तर अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला १० मंत्रीपद मिळणार आहेत.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची अमित शाह आणि भाजप अध्यक्ष जे पी नड्डा यांच्यासोबत बैठक झाली. त्या बैठकीत खातेवाटप फॉर्म्युला ठरल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. भाजपला मिळणाऱ्या खात्याबाबत बैठकीत सविस्तर चर्चा झाली असून भाजपच्या मंत्रिपदाच्या नावांवरदेखील बैठकीत शिक्कामोर्तब झाले आहे.
भाजपकडून जुन्या मंत्र्यांचीच नावे निश्चित केली गेली आहेत. तर राष्ट्रवादीनेही भाजपच्या पावलावर पाऊल टाकत जुन्या नेत्यांवरच विश्वास ठेवला आहे. दुसऱ्या बाजूला शिवसेना शिंदे गटाकडून नव्या चेहऱ्यांना संधी दिली जाणार असल्याचं म्हटलं जात आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, गृह खातं भाजपकडेच राहणार आहे. एकनाथ शिंदे हे गृह खात्यासाठी आग्रही होते. पण आता फॉर्म्युला निश्चित झाला असून यात गृह खातं भाजपच्या वाट्याला आलं असल्याची माहिती सूत्रांनी दिलीय. एकनाथ शिंदे यांना सार्वजनिक बांधकाम आणि नगरविकास खातं मिळू शकतं. तर अजित पवार यांच्याकडे अर्थ खातं कायम राहणार आहे.












