विधानसभा निवडणुकीत राज्यात महायुतीनं अभूतपूर्व असं यश मिळाले. विधानसभेच्या 288 जागांपैकी तब्बल 227 जागा महायुतीनं जिंकल्या. यामध्ये एकट्या भाजपनं सर्वात जास्त 131 जागा जिंकल्या आहेत. तर शिवसेनेनं 55 जागांवर विजय मिळवला. राष्ट्रवादीनं 41 जागांवर आपला झेंडा फडकवला. महायुतीचं जागावाटप जवळपास निश्चित झालंय. झी 24 तासला सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार शिवसेनेला महसूल आणि राष्ट्रवादीला गृहनिर्माण खातं देण्यास भाजप तयार झालंय.






महायुती सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार पुढच्या काही तासांत होण्याची शक्यता आहे. या मंत्रिमंडळ विस्तारासोबत महायुतीत खातेवाटपही होण्याची शक्यता आहे. खातेवाटप करताना गृहखात्यावर दावा ठोकलेल्या शिवसेनेची महसूल खात्यावर बोलवण होण्याची शक्यता आहे. तर हेविवेट असलेल्या अजित पवारांना गृहनिर्माण खातं दिलं जाऊ शकतं.
सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार भाजप स्वतःकडं नगरविकास, गृह, सामान्य प्रशासन, ग्रामविकास, ऊर्जा, सार्वजनिक बांधकाम, ओबीसी कल्याण ही खाती ठेवण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादीला वित्त आणि नियोजन, गृहनिर्माण, अन्न आणि नागरी पुरवठा, वैद्यकीय शिक्षण, महिला आणि बालविकास, मदत आणि पुनर्वसन, अन्न आणि औषध प्रशासन ही खाती दिली जाण्याची दाट शक्यता आहे. शिवसेनेला महसूल सार्वजनिक बांधकाम खात्यासह शालेय शिक्षण, सार्वजनिक आरोग्य, कामगार, राज्य उत्पादन शुल्क, परिवहन, पाणी पुरवठा आणि स्वच्छता ही खाती दिली जाऊ शकतात.
विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनापूर्वीच मंत्रिमंडळ विस्तार होईल अशी इच्छुकांना आशा आहे. संजय राठोड यांच्या मंत्रिपदासाठी तर बंजारा समाजाचा धर्मगुरुच रिंगणात उतरलेत. संजय राठोडांना मंत्रिमडळात घ्यावं यासाठी बंजारा धर्मगुरुंनी एकनाथ शिंदे आणि फडणवीसांची भेट दिली. दुसरीकडं यावेळी मंत्रिपदाची गाडी हुकणार नाही असा विश्वास इच्छुक करतायेत. रखडलेल्या मंत्रिमंडळ विस्तारावर विरोधकांनी टीका केलीय. 20 दिवसानंतरही राज्याच्या गृहखात्याला मंत्री मिळाला नाही यावरुन विरोधकांनी महायुतीवर निशाणा साधलाय.











