महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकांच्या निकालात महायुतीला स्पष्ट बहुमत मिळाले. त्यात भाजप हा मोठा पक्ष ठरला. त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. तर एकनाथ शिंदे, अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली आहे. सध्या मुंबईत राज्याचे विशेष तीन दिवसीय अधिवेशन सुरु आहे. शनिवारी ७ डिसेंबर आणि रविवारी ८ डिसेंबर असे दोन दिवस सत्ताधारी आणि विरोधक आमदारांचा शपथविधी पार पडला. यानंतर आज विशेष अधिवेशनाचा तिसरा आणि शेवटचा दिवस आहे. आज सोमवारी ९ डिसेंबर विधानसभा अध्यक्षांची निवड करण्यात येणार आहे.






महाराष्ट्र विधानसभेच्या विशेष अधिवेशनाचा आजचा शेवटचा दिवस आहे. आज विधानसभा अध्यक्षांची निवड केली जाणार आहे. भाजप नेते राहुल नार्वेकर यांची आज विधानसभा अध्यक्ष म्हणून पुन्हा नियुक्ती केली जाणार आहे. त्यांनी काल विधानसभा अध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केला. दुपारी १२ वाजेपर्यंतच विधानसभा अध्यक्षपदासाठी अर्ज दाखल करण्याची मुदत होती. मात्र कोणीही अर्ज दाखल न केल्याने राहुल नार्वेकर यांची बिनविरोध निवड होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे राहुल नार्वेकर हे पुन्हा एकदा विधानसभा अध्यक्ष म्हणून जबाबदारी घेणार आहेत.
विरोधीपक्ष नेतेपद मिळणार की नाही?
तर दुसरीकडे काल महाविकासआघाडीच्या नेत्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. यावेळी त्यांनी विरोधीपक्ष नेते आणि विधानसभा उपाध्यक्षपद विरोधीपक्षाला देण्यात यावे ही मागणी केली आहे. या मागणीच्या बदल्यात विरोधीपक्ष विधानसभा अध्यक्ष पदासाठी उमेदवार देणार नाही, अशी चर्चा झाल्याचे बोललं जात आहे. काल मुख्यमंत्र्यांच्या बैठकीत विरोधी पक्षांनी ही मागणी केली. त्यामुळे आज शेवटच्या दिवशी सत्ताधारी पक्षाकडून विधानसभा उपाध्यक्ष पद आणि विरोधीपक्ष नेते पदाचा संदर्भात काही निर्णय होणार का, हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
विधानसभा अध्यक्षपदासाठी विश्वास ठराव मांडला जाणार
आज विशेष अधिवेशनाचा शेवटच्या दिवशी उर्वरित 8 नवनिर्वाचित आमदार आमदारकीची शपथ घेतील. यानंतर विधानसभा अध्यक्ष निवडीचा प्रस्ताव मांडला जाईल. हा प्रस्ताव मांडल्यानंतर अध्यक्ष निवड झाल्याची घोषणा करण्यात येणार आहे. उदय सामंत, दिलीप वळसे पाटील, संजय कुटे आणि रवी राणा हे विधानसभा अध्यक्ष पदासाठी विश्वास ठराव मांडतील. यानंतर संयुक्त सभागृहात राज्यपालांचे अभीभाषण होईल.
नागपूरच्या हिवाळी अधिवेशनाचा कालावधी जाहीर होणार
आज सकाळी ११ वाजता विधानभवनात नवनियुक्त आमदारांचा शपथविधी पार पडेल. यानंतर मंत्री परिचय होईल. यानंतर विधानसभा अध्यक्ष म्हणून राहुल नार्वेकर यांची निवड केली जाईल. संध्याकाळी चार वाजता राज्यपालांचे अभिभाषण होईल. यानंतर शोक प्रस्ताव मांडला जाईल. त्यासोबतच आजच नागपूरच्या हिवाळी अधिवेशनाचा कालावधी जाहीर केला जाईल. यानंतर राष्ट्रगीताने विधानसभेच्या विशेष अधिवेशनाचा समारोप होईल.












