पवारांचा हा शिलेदार अजित पवार यांच्याकडून फैलावर; आम्ही बांगड्या भरल्या नाहीत मीच आमदार केलं होतं…

0

पुणे : वडगावशेरीचे उमेदवार सुनील टिंगरे यांच्या प्रचारासाठी बुधवारी अजित पवार यांनी मतदारसंघात सभा घेतली. यावेळी सुनील टिंगरे आणि जगदीश मुळीक यांनी मोठे शक्तिप्रदर्शन केले. दरम्यान, मतदारसंघात होत असलेल्या कुरबुरीबाबत शरद पवार यांचे उमेदवार बाप्पू पठारे यांना सज्जड दम भरला आहे. त्यामुळे मतदारसंघातील चुरस अजून वाढण्याची शक्यता आहे. याआधी बाप्पू पठारे यांच्या पक्षप्रवेशाच्या वेळी शरद पवार यांनी त्यांना “फडतूस आमदार” अशी बोचरी टीका केली होती.

वडगावशेरी मतदारसंघ हा उमेदवारी जाहीर होण्यापूर्वीपासूनच हॉट मतदारसंघ राहिला आहे. अजित पवार भाजप-शिवसेना युतीत सामील झाल्यानंतर वडगावशेरीत विद्यमान आमदारांमध्ये स्पर्धा रंगली होती. कोणाची उमेदवारी धोक्यात येणार आणि कोणाला उमेदवारी मिळणार हा मोठा प्रश्न निर्माण झाला होता. दरम्यान, जगदीश मुळीक यांनी लोकसभेच्या उमेदवारीसाठी मोठे प्रयत्न केले होते. पण शेवटी पक्षश्रेष्ठींनी मुरलीधर मोहोळ यांना उमेदवारी दिली. मात्र विधानसभेसाठी युती धर्म पाळण्यासाठी ही जागा सुनील टिंगरे यांना देण्यात आली. याप्रसंगी आज अजित पवार यांनी त्यांच्या भाषणात जगदीश मुळीक यांना विधिमंडळात पोहोचवण्याचे आश्वासन दिले.

अधिक वाचा  जैन बोर्डिंग होस्टेल व्यवहाराशी माझा काही संबंध नाही! माहिती न घेता चुकीचे आरोप मोहोळांचा कागदपत्रांसह खुलासा

बाप्पू पठारे यांच्या पक्षप्रवेशाच्या भाषणात शरद पवार म्हणाले होते, “म्हणतात, ‘आमचा आमदार दमदार आमदार’. अरे वा, कसला दमदार? चौकशी केली तर कळलं की तो आमदार टिंगरे आहे. अरे वावा! तू कोणत्या तिकिटावर निवडून आलास? तुझ्या पक्षाचा नेता कोण होता? जेव्हा तू निवडून आलास, तेव्हा हा पक्ष कोणी स्थापन केला, राष्ट्रवादीची स्थापना कोणी केली, हे साऱ्या हिंदुस्थानाला माहिती आहे. तू पक्ष सोडून गेलास, ठीक आहे; तुझा काय बंदोबस्त करायचा, हे लोक करतील, याची मला चिंता नाही.” असे म्हणत, शरद पवारांनी सुनील टिंगरेवर टीका केली होती. या टीकेचा प्रत्युत्तर देत अजित पवारांनीही आज शरद पवारांच्या उमेदवाराला सज्जड दम भरला आहे.

अधिक वाचा  ‘स्थानिक’चा मुहुर्त ठरला त्रिस्तरीय निवडणुका! या महिन्यात २९ महापालिका अन् ‘या’ दिवशी २४७ पालिका १४७ पंचायती

अजित पवार म्हणाले, “आजही दडपशाही सुरू आहे. काही कार्यकर्ते महायुतीचे काम करतात तर त्यांना फोन येतो, म्हणतात ‘तुझ्याकडे बघून घेईन.’ अरे, आम्ही काय हातात बांगड्या भरल्या आहेत का? बघून घेऊ.” मी या जिल्ह्याचा अनेक वर्षे पालकमंत्री राहिलो आहे. मी जोपर्यंत सरळ आहे तोपर्यंत सगळं सरळ आहे. नाहीतर अरेला कारे म्हणायची ताकद आमच्याकडे आहे, हे दम भारतात, त्यांना आमदार मी केलं आहे, त्यांना स्टॅंडिंग कमिटीचा चेअरमन मी केला आहे, त्यामुळे त्यांचे अंडी पिल्ले मला सगळी माहिती आहेत, ज्या गावच्या बोरी त्याच गावच्या बाबळी असतात, त्यामुळे तुम्ही गाफील राहू नका” असं म्हणत अजित पवारांनी शरद पवार यांचा उमेदवार बाप्पू पठारे यांना सज्जड दम भरला.

अधिक वाचा  देशात साखर उद्योग अस्वस्थ इथेनॉल निर्मितीवर ‘संक्रांत’ इथेनॉलची अमेरिकेतून आयात? भविष्याची चिंता