बौद्धजन पंचायत समिती संलग्न विवाह मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने सालाबादप्रमाणे याही वर्षी बौद्ध धर्मीय भव्यदिव्य वधू-वर परिचय मेळावा सरसेनानी मा. आनंदराज आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली रविवार दि. २७ ऑक्टोबर २०२४ रोजी सकाळी १०:०० ते ४:०० या वेळेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक सभागृह, भोईवाडा, परेल, मुंबई – १२ येथे मोठया उत्साहात संपन्न झाला.
सदर वधू वर परिचय मेळाव्याचे उद्घाटन कार्याध्यक्ष लक्ष्मण भगत यांच्या शुभहस्ते करण्यात आले तर सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सरचिटणीस राजेशजी घाडगे यांनी लाघवी भाषाशैलीत प्रभावीपणे केले, तर विवाह मंडळाचे अध्यक्ष तुकाराम घाडगे कार्यक्रमाचे प्रस्ताविक सादर केले.
सदर प्रसंगी उपस्थित विवाहोच्छुक तरुण तरुणी व त्यांच्या पालकांना मार्गदर्शन करताना सभापती आनंदराज आंबेडकर म्हणाले की “सध्याचा काळ बिकट असून समाजातील सर्वात महत्वाची असलेली विवाहव्यवस्था ही या बिकट काळात प्रभावित होत आहे, आज कालचे अनेक तरुण तरुणी विवाहव्यवस्थेची मूलभूत सूत्री समजून न घेता लग्न करताना अनेक अटी व शर्ती ठेवतात त्यामुळे अनेकांना लग्न जुळताना बऱ्याच अडचणी येतात, वय हे वेळेसारखे असते ते थांबत नाही म्हणून लग्न करण्याचे योग्य वय निघून जाते, त्यामुळे तरुण तरुणींनी अवाजवी अटी व शर्ती न ठेवता थोडी तडजोड करायला हवी” असे प्रतिपादन केले. तद्नंतर उपसभापती विनोद मोरे व माजी कार्याध्यक्ष किशोर मोरे यांनी ही उपस्थितांना मौलिक असे मार्गदर्शन केले.
सदर वधू वर परिचय मेळाव्याला उपसभापती विनोदजी मोरे, कार्याध्यक्ष लक्ष्मण भगत, उपकार्याध्यक्ष व जेष्ठ बौद्धाचार्य एच. आर. पवार, खजिनदार नागसेन गमरे, गट क्र. १ चे विभाग प्रतिनिधी महेंद्र पवार, न्यायनिवाडा समितीचे अध्यक्ष सि. एम. कासारे, शिक्षण समितीचे माजी अध्यक्ष व माजी विभाग प्रतिनिधी तुळशीराम शिर्के आदी मान्यवरांनी उपस्थिती लावून कार्यक्रमाची शोभा वाढवली. सदर वधू-वर मेळाव्याला मुंबई व उपनगरातून जवळपास २५० हुन अधिक तरुण-तरुणी व त्यांच्या पालकांनी उपस्थिती लावली होती.
सरतेशेवटी सदर मेळावा यशस्वी होण्यासाठी परिश्रम घेणाऱ्या सर्वांचे विवाह मंडळाचे चिटणीस अतुल साळवी यांनी मनःपूर्वक आभार मानून कार्यक्रमाची सांगता केली.