महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरु झाली आहे. महायुतीमध्ये पालघरच्या जागेवर एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेकडून राजेंद्र गावित यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे पालघर विधानसभा मतदारसंघाचे शिंदे गटाचे विद्यमान आमदार श्रीनिवास वनगा हे नाराज झाले आहेत. गेल्या १२ तासांपासून श्रीनिवास वनगा हे नॉट रिचेबल आहेत. विधानसभेची उमेदवारी न मिळाल्यामुळे श्रीनिवास वनगा हे प्रचंड मानसिक तणावाखाली आहेत. त्यांच्या मनात आत्महत्येचे विचार घोळत होते, अशी माहिती त्यांच्या पत्नीने दिली होती. सोमवारी संध्याकाळपासून श्रीनिवास वनगा हे बेपत्ता झाले आहेत.






श्रीनिवास वनगा यांचे दोन्हीही फोन बंद
श्रीनिवास वनगा हे काल संध्याकाळी सात ते साडेसातच्या सुमारास घराबाहेर पडले. त्यांनी घरातून बाहेर पडताना आपण कुठे जातोय हे कोणालाही सांगितलं नाहीत. त्यांचे दोन्हीही फोन बंद आहेत. श्रीनिवास वनगा हे घराबाहेर पडून आता १२ तास उलटले आहेत. त्यांनी कोणाशीही संपर्क साधलेला नाही. यामुळे श्रीनिवास वनगा यांच्या कुटुंबियांची चिंता वाढली आहे.
सध्या श्रीनिवास वनगा यांचा पोलीस शोध घेत आहेत. त्यांच्या घराबाहेर मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. तसेच अनेक कार्यकर्तेही त्यांच्या घराबाहेर जमले आहेत.
पत्नीने सांगितला संपूर्ण घटनाक्रम
आता श्रीनिवास वनगा यांच्या पत्नी सुमन वनगा यांच्याशी संवाद साधला. यावेळी त्यांनी नेमकं काय घडलं, याची सविस्तर माहिती दिली. “श्रीनिवास वनगा हे कालपासून तणावाखाली होते. ते सतत माझा जगून काही फायदा नाही, मी इतका वाईट आहे की मला साहेबांनी डावललं. मी माझ्या जीवाचं काहीतरी बरंवाईट करेन, असे काल ते सतत सांगत होते. आम्ही त्यांना समजवण्याचा प्रयत्न केला. पण ते ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. त्यानंतर ते संध्याकाळी घराबाहेर पडले. त्यांचा फोनही लागत नाही. पण ते परतलेच नाहीत” असे त्या म्हणाल्या.
“मी त्यांच्या मित्रांनाही फोन केला. त्यांच्याकडे विचारपूस केली. मी त्यांच्या ड्रायव्हर, बॉडीगार्डलाही विचारलं. रात्री अंधार होता, त्या अंधारात ते घराबाहेर पडले आणि पटापट चालत गेले”, असेही सुमन वनगा म्हणाल्या.
एकनाथ शिंदेंनी दिलेले आश्वासन
श्रीनिवास वनगा यांच्या पत्नीशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनीही संवाद साधला. यावेळी त्यांनी श्रीनिवास वनगा यांना डहाणू विधानसभा देणार असं सांगितलं होतं. पण तिथून देखील उमेदवारी देण्यात आलेली नाही. त्यावेळी त्यांना पालघरमधून उमेदवारी देतील, असे वाटले होते. पण तिथेही त्यांना उमेदवारी जाहीर झाली नाही. सध्या लोकांचं मत वेगळं आहे. लोकांची पसंती वेगळी आहे. श्रीनिवास वनगा यांना विधानपरिषदेवर पाठवू, असे आश्वासन एकनाथ शिंदेंनी आम्हाला दिले.
पालघरमधून राजेंद्र गावितांना तिकीट
दरम्यान पालघर विधानसभेसाठी श्रीनिवास वनगा यांच्याऐवजी शिंदे गटाकडून माजी खासदार राजेंद्र गावित यांना संधी देण्यात आली आहे. राजेंद्र गावित यांना उमेदवारी देण्यापूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वनगा यांच्याशी चर्चा केली. पण सोमवारी संध्याकाळी शिंदे गटाची उमेदवारी यादी जाहीर झाल्यानंतर श्रीनिवास वनगा यांच्या संयमाचा बांध फुटला. त्यांनी प्रसारमाध्यमांसमोर रडत आपली फसवणूक झाल्याचे सांगितले. ‘उद्धव ठाकरे हे देवमाणूस होते. मी घातकी माणसासोबत गेलो आणि माझा घात झाला’, असे श्रीनिवास वनगा यांनी म्हटले होते.











