न्यूझीलंडने टीम इंडियाला विजयासाठी दुसऱ्या कसोटी सामन्यातील तिसऱ्या दिवशी 359 धावांचं आव्हान दिलं आहे. न्यूझीलंडचा दुसरा डाव हा तिसऱ्या दिवशी पहिल्या सत्रात 255 धावांवर आटोपला. तसेच किवींकडे 103 धावांची मोठी आघाडी होती. त्यामुळे आता भारताला जर सामना जिंकून मालिकेतील आव्हान कायम ठेवायचं असेल तर कोणत्याही परिस्थितीत या धावा करणं भाग आहे. जिंकायचं असेल तर भारतीय फलंदांजांना चांगली कामगिरी करावी लागणार आहे. तर प्रामुख्याने सलामी जोडीवर मोठी जबाबदारी असणार आहे. टीम इंडियाकडे हे आव्हान पूर्ण करण्यासाठी 2 दिवसांपेक्षा अधिक अवधी आहे. त्यामुळे आता रोहितसेना कोणत्या रणनितीने या धावांचा पाठलाग करते? याकडे साऱ्यांचं लक्ष असणार आहे.
टीम इंडियाचं कमबॅक
टीम इंडियाच्या गोलंदाजांनी तिसऱ्या दिवशी जोरदार कमबॅक केलं. भारतीय संघाने न्यूझीलंडला अवघ्या 57 धावांच्या मोबदल्यात 5 झटके दिले आणि 255 वर गुंडाळलं. न्यूझीलंडने दुसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत 5 विकेट्स गमावून 198 धावा केल्या होत्या. तोवर किवींकडे 301 रन्सची लीड होती. मात्र तिसऱ्या दिवशी फक्त 57 धावाच जोडता आल्याने भारताला 359 धावांचं आव्हान मिळालं.
न्यूझीलंडचा दुसरा डाव
न्यूझीलंडकडून दुसऱ्या डावात कॅप्टन टॉम लॅथम याने सर्वाधिक 86 धावा केल्या. तर टॉम ब्लंडेल याने 41 आणि ग्लेन फिलिप्स याने नाबाद 48 धावा केल्या. मात्र या व्यतिरिक्त टीम इंडियाच्या गोलंदाजांनी एकालाही फार मोठी खेळी करु दिली नाही. विल यंग याने 23 धावा जोडल्या. डॅरेल मिचेल याने 18 आणि डेव्हॉन कॉनव्हे याने 17 रन्स केल्या. वरील या फलंदाजांचा अपवाद वगळता एकालाही दुहेरी आकडा गाठता आला नाही. टीम इंडियाकडून वॉशिंग्टन सुंदर याने सर्वाधिक 4 विकेट्स घेतल्या. तर रवींद्र जडेजाने तिघांना मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला. तर आर अश्विनने 2 विकेट्स मिळवल्या.
टीम इंडिया जिंकणार का?
टीम इंडिया प्लेइंग ईलेव्हन : रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जयस्वाल, शुबमन गिल, विराट कोहली, ऋषभ पंत (विकेटकीपर), सर्फराज खान, रवींद्र जडेजा, वॉशिंग्टन सुंदर, रवीचंद्रन अश्विन, आकाश दीप आणि जसप्रीत बुमराह
न्यूझीलंड प्लेइंग ईलेव्हन : टॉम लॅथम (कॅप्टन), डेव्हॉन कॉनवे, विल यंग, रचिन रवींद्र, डॅरिल मिशेल, टॉम ब्लंडेल (विकेटकीपर), ग्लेन फिलिप्स, मिचेल सँटनर, टिम साउथी, एजाज पटेल आणि विल्यम ओरुर्के.