अजित पवारांच्या पक्षाचे नेते बाबा सिद्दीकींच्या हत्येनंतर चर्चेत आलेला गँगस्टर लॉरेन्स बिष्णोई आता चक्क महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुकीत उतरण्याची दाट शक्यता आहे. महाराष्ट्रामधील एका राजकीय पक्षाने बिष्णोईला पत्र लिहून त्यांच्या पक्षाकडून महाराष्ट्राच्या निवडणुकीसाठी तिकीट देण्याची ऑफर केली आहे. आम्ही तुझ्यात भगत सिंगला पाहतो असंही या पक्षाने या पत्रात म्हटलं आहे.
बिष्णोईचा क्रांतिकार असा उल्लेख…
काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादीचे नेते बाबा सिद्दीकी यांची वांद्रे येथील त्यांचे आमदार पुत्र झिशान सिद्दीकी यांच्या कार्यालयासमोर दिवसाढवळ्या गोळ्या घालून हत्या करण्यात आली. या हल्ल्याची जबाबदारी बिष्णोईच्या टोळीने स्वीकारली. सलमान खानला मदत करणाऱ्यांना आम्ही लक्ष्य करणार असून अजूनही काही हल्ले होतील असा इशारा बिष्णोई टोळीने बाबा सिद्दीकींच्या हत्येनंतर दिला. सध्या बिष्णोई टोळीने हा कट कसा रचला यासंदर्भात तपास सुरु असतानाच महाराष्ट्रातील एका राजकीय पक्षाने लॉरेन्स बिष्णोईला पत्र लिहून विधानसभा निवडणूक लढण्याची ऑफर दिली आहे. या पक्षाच्या अध्यक्षांनीच हे पत्र लिहिलं असून यात बिष्णोईमध्ये आम्हाला भगत सिंग दिसतात असाही उल्लेख आहे. बिष्णोईला क्रांतिकार असं म्हणत, लॉरेन्स बिष्णोई आमच्या पक्षाच्या तिकीटावर निवडणूक लढला तर त्याला विजय मिळवून देण्यात आमचा पक्ष कोणतीही कसर सोडणार नाही अशी ऑफर दिली आहे.
अधिकृत नोंदणी असलेला पक्ष
गुजरातमधील साबरमती सेंट्रल जेलमध्ये मागील 9 वर्षांपासून कैद असलेल्या लॉरेन्स बिष्णोईला महाराष्ट्राची विधानसभा निवडणूक लढवण्याची ऑफर देणाऱ्या पक्षाचं नाव आहे, उत्तर भारतीय विकास सेना (यूबीवीएस)! उत्तर भारतीय विकास सेना हा पक्ष निवडणूक आयोग आणि महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगात नोंदणीकृत पक्ष आहे. उत्तर भारतीय विकास सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष सुनील शुक्ला यांनी लॉरेन्स बिष्णोईला पत्र लिहून महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूक लढवण्याची मागणी केली आहे.
आम्ही तुझ्यासाठी निवडणूक लढण्यास तयार आहोत, फक्त…
उत्तर भारतीय विकास सेनेचे अध्यक्ष सुनील शुक्ला यांनी लॉरेन्स बिष्णोईला पाठवलेल्या पत्रात, “आम्हाला तुझ्यात शहीद भगत सिंग दिसतो. महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीसाठी आम्ही चार तिकीटं आधीच निश्चित केली आहेत. लॉरेन्स बिष्णोईने होकार दिला तर 50 उमेदवारांची यादी लवकरच जाहीर करु,” असं म्हटलं आहे. उत्तर भारतीय विकास सेनेचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी चांगली कामगिरी करुन विजय मिळवून आणतील असा दावा केला आहे. आम्ही तुझ्यासाठी निवडणूक लढण्यास तयार आहोत, फक्त तुझ्या उत्तराची वाट पाहत आहे.
…म्हणून देतोय उमेदवारी
सुनील शुक्ला यांनी, “लॉरेन्स बिष्णोई हा राष्ट्रभक्त असून तो उत्तर भारतीय असल्याने आम्ही त्याला उमेदवारी देत आहोत,” असं सांगितलं.