मुंबईच्या टोलनाक्यांवर मोटारींना मोफत प्रवेश,निवडणुकीपूर्वी सरकारची मोठी घोषणा

0
26

मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात आज सोमवारी (ता. 14 ऑक्टोबर) राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वाची बैठक पार पडत आहे. या बैठकीत राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला असून मुंबईकरांना आनंदाची बातमी दिली आहे.

मुंबईतील पाचही टोल नाक्यांवर आज रात्री 12 वाजल्यापासून मोटारींना म्हणजेच कारला मोफत प्रवेश देण्यासाठीची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. त्यामुळे आता ऐरोली, वाशी, दहिसर, मुलुंड-एलबीएस, आनंदनगर टोलनाक्यांवर हलक्या वाहनांना टोलमाफी देण्यात आली आहे.

राज्यात विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत. येत्या दोन ते तीन दिवसांमध्ये आचारसंहिता लागण्याची शक्यता देखील व्यक्त करण्यात येत आहे. याच पार्श्वभूमीवर गेल्या काही दिवसांमध्ये राज्य सरकारने मंत्रिमंडळ बैठकींचा धडाका लावला असून याच्या माध्यमातून 160 पेक्षा अधिक निर्णय घेतले आहेत. यामध्ये अनेक महत्त्वाच्या निर्णयांची घोषणा करण्यात आली आहे. त्यातच आठवड्याच्या सुरुवातीसच सरकारने मुंबईतील पाचही टोलनाक्यांवर कारना टोलमाफी देऊन मुंबईकरांना आणि मुंबईत येणाऱ्या प्रवाशांना मोठा दिलासा दिला आहे. गेल्या काही महिन्यांपासून टोलमाफीसंदर्भात सातत्याने मागणी करण्यात येत होती. ज्याबाबत सरकारकडून अखेरीस निर्णय घेण्यात आला आहे.

अधिक वाचा  संविधानाच्या माध्यमातून पंचशीलेला कायद्याचे अधिष्ठान प्राप्त झाले आहे – विनोद मोरे

महत्त्वाचे म्हणजे या वर्षाच्या सुरुवातीलाच हलक्या वाहनांचा टोल 45 रुपये आकारण्याचा निर्णय घेतला होता. दर तीन वर्षांनी टोलवाढीच्या नियमांतर्गत ही वाढ करण्यात आली होती. सन 2000 पासून, मुंबईत ये-जा करणारे लोक शहराच्या प्रवेशद्वारावर टोल शुल्क भरत आहेत. शहरातील उड्डाणपुलांच्या बांधकामाशी संबंधित खर्च भरून काढण्यासाठी महाराष्ट्र सरकारने टोल लागू केला होता. त्यामुळे गेल्या 22 वर्षांपासून मुंबईच्या प्रवेशद्वारांवर टोल आकारण्यात येत आहे. तसेच, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या महायुतीच्या सरकारची ही शेवटची मंत्रिमंडळाची बैठक ठरण्याची शक्यता आहे. त्यामुळे या बैठकीत सरकारकडून आणखी कोणते महत्त्वाचे मोठे निर्णय घेण्यात येतात, याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे.

अधिक वाचा  रुणवाल पॅनोरमा सोसायटीत श्रीचरणी कामगार कवी राजेंद्र वाघ यांच्या कविता सादर 

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी नऊ वर्षांपूर्वी टोलच्या वाढत्या दरवाढीविरोधात आंदोलन केले होते. त्यानंतर त्यांनी वारंवार टोल रद्द करण्यात यावे, अशी मागणी महायुतीच्या सरकारकडे लावून धरली होती. यासाठी त्यांनी अनेकदा आंदोलन देखील केले होते. याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि राज ठाकरे यांच्यामध्ये बैठक देखील झाली होती. तर सरकारमधील मंत्री दादा भूसे आणि राज ठाकरे यांच्यामध्येही वर्षभरापूर्वी एक महत्त्वाची बैठक झाली होती. यावेळी ठाकरेंनी टोलसंदर्भात अनेक महत्त्वाच्या मागण्या केल्या होत्या. तर त्यांनी केलेल्या या मागण्या जून 2024 पर्यंत मान्य केल्या जातील, अशी आशा राज ठाकरेंनी व्यक्त केली होती. त्यामुळे आता किमान वर्षभरानंतर का असेना पण सरकारने राज ठाकरेंची मागणी मान्य केली आहे.

अधिक वाचा  राज्यव्यापी OBC नेते आक्रमक थेट मराठा आरक्षणाचा शासन निर्णय फाडला, राज्यव्यापी आंदोलनही करणार