पूणे पोटनिवडणूक कधीही जाहीर होणारं?; अजित पवार आग्रहीच; म्हणाले… चाचपणी करतोय

0
1

आगामी लोकसभा, विधानसभा आणि महापालिका निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षाच्या हालचाली वाढल्या आहेत. राष्ट्रवादीने तर आगामी लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने उमेदवारांची चाचपणी देखील सुरू केली आहे. तर दुसरीकडे महाविकास आघाडीत पुणे लोकसभा मतदारसंघाच्या जागेवरून रस्सीखेच सुरू असल्याची परिस्थिती आहे.

यातच चंद्रपूर आणि पुणे लोकसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक कोणत्याही क्षणी लागण्याची शक्यता आहे. पुणे लोकसभा मतदारसंघावर राष्ट्रवादी आजही आग्रही असल्याचे सूतोवाच विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केले आहे. राष्ट्रवादी भवनात आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना अजित पवारांनी याबाबत भाष्य केलं.

पवार म्हणाले, “महाविकास आघाडीतील तिन्ही पक्ष लोकसभेच्या 48 जागांची चाचपणी करत आहेत. चाचपणी करण्याचा सर्वांनाच अधिकार आहे. लवकरच पुणे आणि चंद्रपूरची पोटनिवडणूक लागण्याची शक्यता आहे. या निवडणुका जाहीर होण्याअगोदर जागा कुणी लढवायच्या यावर चर्चा होईल. चंद्रपूर तर काँग्रेसची आहे आणि पुणे जागेबद्दल काँग्रेसचे वेगळे मत आहे, आमचेही वेगळे मत आहे. त्यातून आम्ही मार्ग काढू”, असं अजित पवार म्हणाले.

अधिक वाचा  राज्यात ओबीसी उपसमिती काय काम करणार?; उपसमितीची कार्यकक्षाही निश्चित झाली फडणवीसही सरसावले

दरम्यान, भाजपचे पुण्याचे खासदार गिरीश बापट यांच्या निधनाने पुणे लोकसभेची जागा रिक्त झालेली आहे. तर काँग्रेसचे चंद्रपूरचे खासदार बाळू धानोरकर यांचं काही दिवसांपूर्वी निधन झालं. त्यामुळे चंद्रपूर आणि पुणे लोकसभा मतदारसंघात पोटनिवडणूक होण्याची शक्यता आहे. त्या पार्श्वभूमीवर पुणे लोकसभेच्या जागेसाठी अजित पवार आग्रही असल्याची चर्चा आहे.