टीम इंडियाचा स्टार वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी आपल्या खासगी आयुष्यामुळे अनेकवेळा चर्चेत असतो. 2018 मध्ये शमीची पत्नी हसीन जहांने (Hasin Jahan) त्याच्यावर गंभीर आरोप करत नातं तोडलं होतं. त्यामुळे शमी लेक मायरालाही (Maira) भेटू शकला नाही. आता खूप वर्षानंतर मोहम्मद शमीला (Mohammed Shami) त्याची लेक भेटायला आली, मायराला पाहून शमीचे डोळे पाणावले. आपल्या मुलीला पाहून शमी भावूक झाला आणि तिला मिठी मारली. ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
कॅमेरात कैद झाला भावनिक क्षण
अनेक वर्षानंतर शमीची लेकीबरोबर भेट झाली. याचा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर शेअर करण्यात आला आहे. वडिलांना भेटू मायरादेखील खूप आनंदी दिसत होती. बाप-लेकीने मिळून मॉलमध्ये भरपूर शॉपिंग केली. लेकीसाठी कपडे, बूटांची खरेदी केली. 2018 मध्ये ज्यावेळी शमी आणि हसीन जहां वेगळे झाले, त्यावेळी मायरा खूप लहान होती. अनेकवेळा शमी आपल्या लेकीच्या आठवणीने हताश झाल्याचं चाहत्यांनी पाहिलंय. आपल्या मुलीला भेटू दिलं जात नसल्याचंही त्याने सांगितलं होतं. आता बऱ्याच वर्षांनी मुलीचा चेहरा पाहाताच शमीच्या चेहऱ्यावर आनंद पसरला.
पोस्टमध्ये लिहिली मनातील भावना
लेकीबरोबरच्या फोटोबरोबरच मोहम्मद शमीने एक पोस्टही शेअर केली आहे. यात त्याने म्हटलंय ‘बऱ्याच काळानंतर मी तिला पाहिल्यावर वेळही थांबली, बेबो मी तुझ्यावर खूप प्रेम करतो जे शब्दातही सांगता येणार नाही’ शमीची ही पोस्ट वाचून चाहत्यांनीही भावनिक प्रतिक्रिया दिल्या आहेत.
मोहम्मद शमी सध्या सुट्टीवर आहे. दुखापतीनंतर शमीची अद्याप टीम इंडियात एन्ट्री झालेली नाही. आगामी न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत शमीचं पुनरागमन होईल अशी शक्यता वर्तवली जात आहे. बांगलादेश मालिकेनंतर येत्या 16 ऑक्टोबरपासून भारत आणि बांगलादेशदरम्यान कसोटी मालिका खेळवली जाणार आहे. यासाठी लवकरच बीसीसीआय टीमची घोषणा करेल.