लोकसभा निवडणुकीत महायुतीला फटका बसल्यानं विधानसभेची सूत्रे अमित शहा यांनी आपल्या हाती घेतली आहेत. त्यापार्श्वभूमीवर शहा यांनी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना विजयाचा मंत्र दिला आहे. लोकसभा निवडणुकीत विदर्भ आणि मराठवाड्यात भाजपला मोठे धक्के बसले. मराठवाडा आणि विदर्भात महायुतीचे फक्त चारच खासदार निवडून आले आहेत. मराठवाड्यात मराठा आरक्षण आणि विदर्भात भाजपविरोधी रोषाचा सामना महायुतीला करावा लागला.
विधानसभेला हाच ट्रेंड राहिला, तर महायुतीला सत्तेतून बाहेर पडावं लागणार आहे. मात्र, ‘डॅमेज कंट्रोल’ करण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी विदर्भ आणि मराठवाड्यातून रणनीती आखून विधानसभेचं रणशिंग फुंकलं आहे. लोकसभा निवडणुकीत मराठवाड्यात भाजपचा सुफडासाफ झाला. मराठा नेते, मनोज जरांगे-पाटील यांच्या आंदोलनाचा फटका भाजपला मोठ्या प्रमाणात बसला. त्यासह विदर्भातही भाजपविरोधी रोषामुळे महायुतीचा ‘परफॉर्मन्स’ चांगला राहिला नाही. विदर्भात महायुतीचे 10 पैकी 3 तर, मराठवाड्यात 8 पैकी फक्त एकच खासदार निवडून आला.
मराठा आंदोलन हाताळत विजय मिळवणार…
पण, विधानसभेला या मुद्द्यांचा फटक बसू नये, म्हणून गृहमंत्री अमित शाह यांनी नागपूर आणि छत्रपती संभाजीनगर येथे ‘स्ट्रॅटर्जी’ ठरवली. मराठा आरक्षणाचे आंदोलन पुन्हा पेटलं आहे. मात्र, मराठा आरक्षणाचे आंदोलन हाताळून विजय मिळविण्याचा राजमंत्र अमित शाह यांनी सांगितला आहे. गुर्जर, पटेल आणि ठाकूर यांच्या आरक्षणाचे आंदोलन आपण यापूर्वी चांगल्या प्रकारे हाताळले आहे. त्याप्रमाणे मराठा आंदोलन हाताळून विजय मिळवू, असा विश्वास अमित शाह यांनी पदाधिकाऱ्यांमध्ये निर्माण केल्याचं सांगितलं जात आहे.
बंडखोरी अन् गटवाजी सहन करणार नाही…
महायुतीचे जागावाटप तीनही पक्षांच्या समन्वयातून होईल. एकदा का युतीचा उमेदवार ठरला की त्याच्या विजयासाठी सर्वांनी प्रयत्न करायचे आहे. काही जागा मित्रपक्षांसाठी सोडाव्या लागतील. तेथे नेते, कार्यकर्त्यांनी मनापासून काम करावे. बंडखोरी, गटबाजी अजिबात सहन करणार नाही, असा दम अमित शाह यांनी पदाधिकाऱ्यांना भरला आहे.