बंगळुरुत हॉस्टेलमध्ये घुसून एका 24 वर्षीय तरुणीची चाकूने भोसकून हत्या करण्यात आल्याने देशभरात खळबळ उडाली आहे. ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद झाली असून, आरोपी अत्यंत निर्दयीपणे तिच्यावर चाकूने वार करत असल्याचं दिसत आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली असून, तो पीडित तरुणीच्या रुममेटचा प्रियकर आहे अशी माहिती मिळत आहे.






आरोपी अभिषेक आणि त्याच्या प्रेयसीत नेहमी तो बेरोजगार असल्याने वाद होत होता. यांच्यातील वाद दिवसेंदिवस वाढत चालला होता. दोघांच्या या वादात अनेकदा पीडित तरुणी किर्ती कुमारीही पडत असे. यामुळे हा वाद आणखी टोकाला जात असे. मिळालेल्या माहितीनुसार, किर्ती कुमारीने तिच्या मैत्रिणीला अभिषेकपासून दूर राहण्याचा सल्ला दिला होता.
यानंतर किर्ती आणि तिच्या मैत्रीणींनी अभिषेककडे दुर्लक्ष करण्यास सुरुवात केली होती. काही दिवसांपूर्वी अभिषेक पीजी हॉस्टेलला आला आणि तिथे वाद घातला. यानंतर किर्ती कुमारीने तिच्या मैत्रिणीला नवीन पीजी हॉस्टेलमध्ये शिफ्ट होण्यासाठी मदत केली होती. तसंच दोघींनी अभिषेकचे कॉल उचलणंही बंद केलं होतं. यामुळे अभिषेकचा पारा चढला होता. याच संतापातून त्याने किर्ती कुमारीची हत्या केली.











