शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांचा आज 64 वा वाढदिवस आहे. 2003 साली शिवसेना पक्षाचे कार्यध्यक्ष झाल्यापासून उद्धव ठाकरे यांची राजकिय कारकिर्द ही संघर्षाचीच राहीली आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनानंतर शिवसेना पक्षाला सत्ताधारी पक्ष बनवण्यात त्यांनी यश तर मिळवलंच, पण त्यांच्याच कारकिर्दीत शिवसेना पक्ष दूभंगला आणि पक्षाच्या अस्तित्वासाठी त्यांना आता संघर्षही करावा लागतोय.






उद्धव ठाकरे आज 64 वर्षांचे झालेत, या पैकी मागची 20 वर्षे ही त्यांची राजकिय कारकिर्द राहीली आहे. 2003 साली महाबळेश्वर येथील शिवसेनेच्या राष्ट्रीय शिबिरात त्यांची पक्षाचे कार्यध्यक्ष म्हणून शिवसेना नेते राज ठाकरे यांनी अधिकृत घोषणा केली होती. उद्धव ठाकरे शिवसेनेचे कार्यध्यक्ष झाल्यावर त्यांनी शिवसेना पक्षाला एक शिस्त लावली. पक्षाची बांधणी कॉर्पोरेट पद्धतीने केली. चाळ प्रमुख, इमारत प्रमुख आणि गट प्रमुख ते शाखा प्रमुख, विभाग प्रमुख, जिल्हा संपर्क प्रमुख आणि विभागिय नेते अशी तळागाळातली मजबूत संघटना बांधली. त्याचा परीणाम निवडणुकीत शिवसेनेचे उमेदवार विजयी होऊन लोकप्रतिनिधी बनले.
उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या कारकिर्दीच्या सुरवातीलाच ‘मी मुंबईकर’ मोहीम राबवली, त्यांच्याच कारकिर्दीत मुंबई महापालिकेवर शिवसेनेचा भगवा सलग चार वेळा निवडणुकीत विजयी होऊन फडकला. 2014 साली लोकसभा निवडणुकीत सर्वाधिक खासदार निवडून आणले तसंच 2014 साली विधान सभा निवडणुकीत भाजप विरोधात रणशिंग फुंकत स्वबळावर 64 आमदार निवडून आणले.
विधानसभा निवडणूक निकालानंतर महिनाभरात भाजप सोबत पुन्हा घरोबा करत सत्ताधारी पक्ष बनवला. पण सत्ताकारणात भाजप सोबत नेहमीच तू तू मै मै सुरूच राहीली, मग त्या 2018 सालच्या महापालिका निवडणुका असोत किंवा किंवा मग 2019 च्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुका असोत. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेचे मित्र पक्ष भाजपासोबत नेहमीच खटके उडत राहीले. 2019 च्या विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर तर उद्धव ठाकरे यांच्या ताठर भूमिकेमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात भूकंप घडवून आणला. राजकारणात कट्टर शत्रू असणाऱ्या काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस सोबत शिवसेनेनं घरोबा केला आणि राज्यातील सत्ता हस्तगत केली. पारंपारिक जूना मित्र असलेल्या भाजपला विरोधी बाकांवर बसावे लागले. पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे हे राज्याचे मुख्यमंत्री बनले. पण त्यांचा मुख्यमंत्री पदाचा कार्यकाळ हा अडीच वर्षांचाच राहीला.
शिवसेनेला पक्ष फुटीचा शाप शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या हयातीपासूनच लागला होता. नव्वदच्या दशकात आधी शिवसेनेचे मातब्बर नेते छगन भुजबळ, गणेश नाईक यांनी शिवसेनेचा जय महाराष्ट्र केला. त्यानंतर उद्धव ठाकरे शिवसेनेचे कार्याध्यक्ष बनल्यावर त्यांच्या कारभारावर प्रश्नं चिन्हं निर्माण करत शिवसेना नेते आणि माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी बंड केले. त्यानंतर शिवसेना नेते राज ठाकरे यांनी केलेले बंड तर शिवसेनेच्या जिव्हारी लागले. त्यानंतरच्या सर्वच निवडणुका या उद्धव ठाकरे विरुद्ध राज ठाकरे अशा रंगल्या होत्या. यावेळी उद्धव ठाकरे यांच्यावर टोकाची टिका करण्यात आली होती.
अशा राजकिय आणि कौटुंबिक संघर्षातूनही उद्धव ठाकरे यांनी शिवसेना पक्ष कसा बसा सावरला होता. पक्षाला युवकांची साथ मिळवण्यासाठी आदित्य ठाकरे यांना युवासेनाप्रमुख बनवण्यात आले. पण उद्धव ठाकरे यांच्या राजकिय कारकिर्दीतील निर्णायक संघर्ष उभा राहीला तो विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेल्या शिवसेनेतील उठावामुळे. शिवसेनेत या आधीच्या नेत्यांनी जे बंड केले ते शिवसेना पक्षाला खिंडार पाडणारे होते, पण एकनाथ शिंदे यांनी केलेला उठाव हा शिवसेना पक्षालाच हायजॅक करणारा ठरला.
शिवसेना पक्षाचे नाव आणि अधिकृत निवडणुक चिन्ह धनुष्यबाण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला मिळाले. पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या सोबत राहीलेल्या आमदारांना पक्षाचे नवे नाव मिळाले शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, उद्धव ठाकरे यांच्यासाठी मोठा आघात होता, पण शिवसेनेचा संघर्षाचाच इतिहास आहे, असे सांगत उद्धव ठाकरे यांनी नवा डाव मांडण्यास सुरवात केली.
नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत उद्धव ठाकरे यांनी त्यांचे 9 उमेदवार निवडून आणले, पण पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांची खरी परिक्षा ही येणाऱ्या विधान सभा निवडणुकीत होणार आहे. आणि या निवडणुकीत त्यांचा सामना होणार आहे तो स्वपक्षातूनच वेगळे झालेल्या शिवसैनिक आणि लोकप्रतिनिधींच्या सोबत, त्यामुळे येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेच्या अस्तित्वासोबतच आणि उद्धव ठाकरे यांच्या राजकीय कारकिर्दीतील नेतृत्वाचाही कस लागणार आहे.











