मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी राज्यभर आंदोलन छेडणारे मनोज जरांगे पाटील यांची पुण्यात शांतता रॅली होणार आहे. ११ ऑगस्ट रोजी होणाऱ्या या शांतता रॅलीत पुणे शहर व जिल्ह्यातील २५ लाखांहून अधिक मराठा बांधव सहभागी होणार आहेत. अखंड मराठा समाज पुणे जिल्हा यांच्या वतीने पुणे जिल्ह्यातील मराठा बांधवांची ७ जुलै रोजी चांदणी चौक येथे बैठक पार पडली होती. मराठा आरक्षणासंदर्भात मनोज जरांगे पाटील यांनी जनजागृती करावी, याबाबतचा निर्णय या बैठकीमध्ये झाला. या शांतता रॅलीबाबत मराठा सेवक व पोलिस आयुक्तांचीही बैठक झाली. त्यानुसार, शांतता रॅलीचा मार्ग निश्चित करण्यात आला आहे.






११ ऑगस्ट रोजी सकाळी अकरा वाजता जरांगे पाटील यांच्या शांतता रॅलीस सारसबाग येथील तळ्यातील गणपती मंदिरापासून होईल. ही रॅली बाजीराव रस्ता, अप्पा बळवंत चौक मार्गे छत्रपती शिवाजी महाराज मिलिटरी स्कूल येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळा परिसरात पोचेल. तेथे जरांगे पाटील यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास अभिवादन करून पुष्पहार अर्पण करतील.
त्यानंतर ही रॅली जंगली महाराज रस्ता येथून डेक्कन येथे पोचेल. तेथे छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुतळ्यास अभिवादन केल्यानंतर टिळक चौकात (अलका टॉकीज चौक) जरांगे पाटील यांचे भाषण होणार आहे. नदीपात्र परिसर व परिसरातील शाळा, महाविद्यालयांच्या मैदानांमध्ये वाहनांच्या पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे. मराठा बांधवांनी कुटुंबासह या रॅलीत सहभाग घ्यावा, असे आवाहनही यावेळी मराठा सेवकांनी केले.
…फक्त मराठा सेवक म्हणूनच सहभागी व्हा
या रॅलीमध्ये आजी माजी नगरसेवक, आमदार, खासदार, विविध राजकीय पक्षांमधील नेते, पदाधिकारी, कार्यकर्त्यांनाही सहभाग घेता येईल. फक्त त्यांनी त्यांचे राजकीय पक्ष, चिन्ह, पद बाहेर ठेवून व सर्वसामान्य मराठा सेवक म्हणूनच या रॅलीत सहभाग घ्यावा, असेही मराठा सेवकांनी सांगितले.










