टीम इंडिया श्रीलंका दौऱ्यासाठी सज्ज आहे. टीम इंडिया या दौऱ्यात टी20 आणि वनडे सीरिज खेळणार आहे. सूर्यकुमार यादव टी20 आणि रोहित शर्मा वनडे सीरिजमध्ये टीम इंडियाचं नेतृत्व करणार आहे. हेड कोच म्हणून गौतम गंभीर याचा पहिलाच दौरा आहे. हेड कोच गंभीर आणि निवड समिती अध्यक्ष अजित आगरकर यांची श्रीलंका दौऱ्याला रवाना होण्याआधी मुंबईत पत्रकार परिषद पार पडली. दोघांनी पत्रकारांच्या विविध प्रश्नांची उत्तर दिली. गंभीरला या दरम्यान विराट कोहलीबाबत प्रश्न विचारण्यात आला, ज्याची साऱ्यांना आशा आणि प्रतिक्षा होती. तेव्हा गंभीरने सारं काही सांगून टाकलं.






गंभीर विराटबाबत काय म्हणाला?
गंभीरने पहिल्याच पत्रकार परिषदेत विविध प्रश्नांवर जोरदार बॅटिंग दिली. गंभीरने इतर प्रश्नांवर जशी उत्तरं दिली, तसंच तो विराटबाबतही बोलला. “आमच्या दोघांबाबत जे काही सुरु असतं ते टीआरपीसाठी पोषक आहे. मात्र माझे विराटसोबतचे नाते चांगले आहेत. आम्ही दोघे 140 कोटी भारतीयांचं प्रतिनिधित्व करतोय, हे आमच्यासाठी अभिमानाची बाब आहे”
कोच झाल्यानंतर विराट सोबत काही बोलणं झालं का? असाही प्रश्न पत्रकारांनी गंभीरला केला. गंभीरने याचं उत्तर देताना म्हटलं की, “हो, आमच्यात मेसेजद्वारे बोलणं झालं, मात्र काय संवाद झाला हे जगजाहीर करणार नाही. आमच्यात काय बोलणं झालं, कुठे बोलणं झालं, कोच झाल्यानंतर संवाद झाला की त्याआधी, हे मी सांगणार नाही. मी एक खेळाडू म्हणून विराटची फार इज्जत करतो. आशा आहे की एकत्र मिळून टीम इंडियासाठी चांगली कामगिरी करु”.
हेड कोच गंभीरची विराटबाबत प्रतिक्रिया
दरम्यान विराटने वर्ल्ड कप विजयानंतर टी 20 क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. आता टीम इंडिया श्रीलंका दौऱ्यात टी 20 आणि वनडे सीरिज खेळणार आहे. विराट वर्ल्ड कपनंतर टीम इंडियात कमबॅक करणार आहे. विराट आता टी20 निवृत्तीनंतर वनडेमध्ये कसा खेळ करतो, याकडे साऱ्यांचंच लक्ष असणार आहे.











