उद्धव ठाकरेच मराठा आरक्षणाचे खरे मारेकरी असून देवेंद्र फडणवीस यांना व्हिलन केलंय जातंय, अशी टीका भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली. राज्यात भाजप-शिवसेना युतीचे सरकार असताना देवेंद्र फडणवीस यांनी २० रात्र जागून मराठा आरक्षण देणारा कायदा केला. पण उद्धव ठाकरे यांच्या सरकारने सुप्रीम कोर्टात महत्वाचा मुद्दा मांडला नाही, असा आरोपही बावनकुळे यांनी केला. ते पुणे येथील भाजपच्या महाअधिवेशनात बोलत होते.






कैरीआगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुण्यात भाजपचे महाअधिवशेन होत आहे. आज या अधिवेशनाला सुरुवात झाली. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासह राष्ट्रीय स्तरावरील नेते, मंत्री या अधिवेशनाला उपस्थित आहेत. तसेच राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, राष्ट्रीय महासचिव विनोद तावडे, केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव, भुपेंद्र यादव, पीयूष गोयल, आशिष शेलार, पंकजा मुंडे, मंगल प्रभात लोढा यांचीही अधिवेशनाला उपस्थिती आहे.
दरम्यान, या अधिवेशनात भाषण करताना भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी महाविकास आघाडीवर जोरदार निशाणा साधला. बावनकुळे म्हणाले, ‘देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारने मराठा समाजाला आरक्षण दिलं होतं. मी त्यावेळी मंत्री होतो. देवेंद्र फडणवीस यांनी सलग २० रात्र जागून मराठा आरक्षणाचा कायदा तयार केला होता. त्यावेळी आम्ही त्यांना म्हणायचो, की तब्येतीची काळजी घ्या”.
शेवटी त्यांनी मराठा आरक्षणाचा कायदा तयार केला. विधीमंडळात तो एकमताने मंजूर करण्यात आला. हायकोटनि देखील या कायद्याला मंजूरी दिली. पण त्यानंतर उद्धव ठाकरे यांच्या सरकारने मराठा समाज कसा आर्थिक दुर्बल आणि कमजोर आहे, त्यामागचा भाग सुप्रीम कोर्टात मांडला नाही. त्यामुळे मराठा आरक्षण रद्द झाले, असा आरोप चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला.
“जर उद्धव ठाकरे यांनी जर सुप्रीम कोर्टात ४ चांगले उच्चस्थरीय वकील दिले असते. तर मराठा समाजाचा आरक्षणाचा प्रश्न कायमचाच सुटला असता. पण असं झालं नाही. त्यामुळे मराठा समाजाचे खरे मारेकरी उद्धव ठाकरे आहेत. आज सामाजिक आंदोलनाच्या माध्यमातून देवेंद्र फडणवीस यांना व्हिलन केलं जातंय. काहींच्या तोंडातून राजकीय वास येतोय”, अशी टीकाही बावनकुळे यांनी मनोज जरांगे पाटील यांच्यावर नाव न घेता केली.











