मराठा आरक्षण आणि समाजाच्या इतर मागण्यांसाठी मनोज जरांगे पाटील यांनी आजपासून अंतरवाली सराटी येथे अमरण उपोषण सुरू केले आहे. यावेळी पत्रकारांनी बोलताना जरांगे पाटील यांनी विधानसभा निवडणुकीचे बिगुल फुंकले असून, सर्व समाजातील इच्छुक उमेदवारांना अंतरवाली सराटीला बोलावले आहे.
दरम्यान लोकसभा निवडणुकीत जरांगे फॅक्टरचा मोठा फटका भाजप आणि महायुतीला बसला आहे. त्यामुळे जर जरांगे यांनी उमेदवार दिले तर सर्वच राजकीय पक्षांची विधानसभा निवडणुकीत पळापळ होणार हे नक्की.
यावेळी जरांगे पाटील म्हणाले, “१३ ते २० ऑगस्ट दरम्यान मी अंतरवाली सराटीमध्ये असणार आहे. आपल्याला निवडणुकीची तयारी करायची आहे. याकाळात प्रत्येक मतदासंघाबाबतची माहिती घेऊन या. आपल्याला सर्वच्या सर्व २८८ जागांची तयारी करायची आहे. त्यामुळे सर्व जाती-धर्माच्या इच्छुकांनी तयारीने यावे.”
ते पुढे म्हणाले, “जर सर्व समीकरण जुळले तर आपल्याला निवडणूक लढवता येईल. त्यामुळे बारा बलुतेदारांनी एकत्र येत सर्व जाती धर्मांच्या लोकांना निवडून आणायचे आहे.”
महायुती, ‘मविआ’ला टोला
जरांगे पाटील यांनी विधानसभा निवडणुकीबाबत बोलताना राज्यातील सत्ताधारी आणि विरोधकांच्या आघाडीला जबरस्त टोला लगावला. ते म्हणाले, “आपण जर निवडणूक लढवली तर महायुतीचे लोक होतील आणि नाही लढवली नाही तर महाविकस आघाडीवाले खुश होतील. त्यांची स्टाईल बघा आघाडीवाले म्हणत आहेत ओबीसीबाबत बोलू नका. अशी शाळा सुरू आहे. दोन्ही आघाड्या आपल्याला वेड्यात काढत आहेत.”
दरम्यान जरांगे पाटील गेल्या वेळी उपोषणाला बसले होते तेव्हा, राज्य सरकारने 13 जुलै रोजी सगे-सोयर अधिसूचना जारी करण्याचे आश्वासन दिले होते. ही मुदत संपल्यानंतर मराठा समाजाच्या बैठकीत त्यांनी पुन्हा उपोषणाला बसण्याचा निर्णय घेतला आहे.
जालना येथील त्यांच्या गावी अंतरवली सराटी येथे जरांगे बेमुदत उपोषणास बसले आहेत. जरांगे 7 ऑगस्ट रोजी सोलापूर येथून शांतता रॅली सुरू करणार असून 13 ऑगस्ट त्याचा शेवट होणार आहे.