“सौगात-ए-मोदी” ही योजना भारतीय जनता पक्षाने सुरू केलेली आहे. अल्पसंख्यक समुदायांतील कुटुंबांना ईद निमित्त भेटवस्तू किट वितरित केली जाणार असल्याची माहिती आहे. तसंच बैसाखी, गुड फ्रायडे आणि ईस्टरसारख्या सणांच्या निमित्तानेही भेटी दिल्या जाणार आहेत. यावरुन आता उद्धव ठाकरे यांनी भाजपवर निशाणा साधला आहे.
तुम्हीही हिंदूत्व सोडलं का?
ईदनिमित्त भाजप सौगात ए मोदीच्या माध्यमातून खाद्यपदार्थ भेट देणार आहेत. सेवई, खजूर, सुके मेवे, साखर आणि कपडे यांचा यामध्ये समावेश असतो. प्रत्येक किटची किंमत अंदाजे 500 ते 600 रुपये आहे. उद्धव ठाकरे यांनी आज या संपूर्ण गोष्टींवरुन भाजपवर निशाणा साधत हे ‘सौगात ए सत्ता’आहे का? तुम्हीही हिंदूत्व सोडलं का? असे सवाल केले.
सौगात ए सत्ता…
आम्ही जर आमच्या कर्तृत्वानं मुस्लिम समाजाची मतं मिळवत असू, तर तुमच्या पोटात का दुखलं? ज्या धर्मात तुम्ही विष पेरलं, आता त्यांच्या दारोदारी जाऊन अन्न देणार, मग हा सत्ता जिहाद नाही का? असे सवाल उद्धव ठाकरे यांनी केले आहेत. उद्धव ठाकरे यांनी पुढे बोलताना सवाल केले की, ज्या घरावर बुल्डोझर चालवलं, तिथेही सौगात-ए-मोदी देणार का? ही सौगात-ए-सत्ता फक्त बिहार निवडणुकीसाठी आहे की, पुढे कायम राहणार हा सुद्धा सवाल ठाकरेंनी केला.
“लोकांनी पोळ्याला बैलावरही लिहिलं, 50 खोके- एकदम OK”
कुणाल कामरा यांच्यावर केलेल्या प्रश्नावर उद्धव ठाकरे म्हणाले, मी काय त्यांचं वकिलपत्र घेतलेलं नाही. पण सत्य हे सत्य असतं. गावागावात 50 खोके एकमद OK हे बैलपोळ्यालाही बैलावर लिहिलं होतं असं ठाकरे म्हणाले. तसंच शिवसेना वगैरे नाही, तर ‘एसंशि’गटाने कामराने शो केलेला स्टुडिओ फोडला असं ठाकरे म्हणाले आहेत.