राज्यातील राजकीय समीकरणं लक्षात घेतल्यास ही निवडणूक रंजक बनली आहे. महाराष्ट्रात विधान परिषदेच्या 11 जागांसाठी 12 जुलै रोजी मतदान होणार आहे. 11 जागांसाठी एकूण 12 अर्ज आल्याने आणि कुणीही अर्ज मागे न घेतल्याने निवडणूक होणार हे निश्चित झालं. कारण छुप्या पद्धतीने मतदान होणार असल्याने क्रॉस व्होटिंगही होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे मतदानापूर्वी ठाकरेंच्या शिवसेनेसह महायुतीमधील पक्षांना दगाफटका होण्याची भीती आहे. त्यामुळे निवडणुकीपूर्वी महाराष्ट्रात पुन्हा एकदा हॉटेल पॉलिटिक्स सुरू झालं आहे. भाजप, शिवसेना (UBT), शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) यांनी त्यांच्या आमदारांना हॉटेलमध्ये राहण्याचे आदेश दिले आहेत.






कोणत्या पक्षाचे आमदार कोणत्या हॉटेलमध्ये?
भाजपा- ताज प्रेसिडेन्सी, कुलाबा
शिवसेना- ताज लँड्स एंड, वांद्रे
शिवसेना (UBT)- ITC ग्रँड मराठा, परळ
NCP (अजित पवार)- हॉटेल ललित, अंधेरी विमानतळ
काय आहे विधानपरिषद निवडणुकीचं गणित?
महाराष्ट्र विधानसभेचे सध्याचे संख्याबळ 274 आहे. विधानसभेचे एकूण संख्याबळ हे 288 आहे. सध्याचं संख्याबळ लक्षात घेता विधानपरिषदेची एक जागा जिंकण्यासाठी प्रत्येक उमेदवाराला 23 मतांची आवश्यकता आहे. विधानपरिषद निवडणुकीत भाजपचे 5, शिवसेना (शिंदे गट) 2 आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) 2 उमेदवार रिंगणात आहेत. म्हणजे महायुतीचे एकूण 9 उमेदवार हे रिंगणात आहेत. तर दुसरीकडे महाविकास आघाडीने आपले 3 उमेदवार या निवडणुकीत उतरवले आहेत.
महाविकास आघाडीमधील शिवसेना (UBT)ने 1 उमेदवार दिला आहे. तर काँग्रेसनेही 1 उमेदवार दिला आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) यांच्या पक्षाने भारतीय शेतकरी कामगार पक्षाचे जयंत पाटील यांना आपला पाठिंबा जाहीर केला आहे.
कोणत्या पक्षाचे किती आमदार?
भाजप- 103काँग्रेस- 37शिवसेना (UBT)- 15शिवसेना (शिंदे गट)- 38राष्ट्रवादी (अजित पवार)- 40राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार)- 12
छोट्या पक्षांचे किती आमदार आहेत?
बहुजन विकास आघाडी- 3समाजवादी पक्ष- 2एमआयएम-2प्रहार जनशक्ती पक्ष-2मनसे-1पीझंट्स अँड वर्कर्स पार्टी ऑफ इंडिया- 1नॅशनल सोसायटी पार्टी- 1कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया (मार्क्सवादी)- 1क्रांतिकारी शेतकरी पक्ष- 1जन सुराज्य शक्ती- 1अपक्ष- 13
विविध पक्षांकडून विधान परिषद निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांची नावे
भाजपचे 5 विधानपरिषद उमेदवार
1. पंकजा मुंडे2. परिणय फुके3. सदाभाऊ खोत4. अमित गोरखे5. योगेश टिळेकर
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजित पवार)
1. शिवाजीराव गर्जे2. राजेश विटेकर
शिवसेना (शिंदे गट)
1. कृपाल तुमाने2. भावना गवळी
शिवसेना (UBT)
1. मिलिंद नार्वेकर
काँग्रेस
1. प्रज्ञा सातव
शेकाप – राष्ट्रवादीचे शरद पवार समर्थक उमेदवार
1. जयंत पाटील
शिवसेनेने (UBT) मिलिंद नार्वेकर यांना विधानपरिषद निवडणुकीत उमेदवारी दिल्यामुळे विधानपरिषद निवडणुकीचे गणित बिघडलं आहे. निवडणूक जिंकण्यासाठी प्रत्येक उमेदवाराला 23 मतांची आवश्यकता आहे. अशावेळी शिवसेनेकडे (UBT) फक्त 15 आमदार आहेत. तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) समर्थित उमेदवार जयंत पाटील यांनाही विजयासाठी अन्य पक्षांच्या आमदारांवर अवलंबून राहावे लागणार आहे. विधानपरिषद निवडणुकीत क्रॉस व्होटिंग झाले तर त्याचा सर्वाधिक फायदा उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादीचे (शरद पवार) समर्थित उमेदवार जयंत पाटील यांना होईल.











