खासगी गाडीवर लाल दिवा लावणाऱ्या आणि चेंबरवर डल्ला मारणाऱ्या ट्रेनी IAS अधिकारी पूजा खेडकर यांची वाशिम जिल्हाधिकारी म्हणून बदली झाली आहे. पुणे जिल्ह्यात परिविक्षाधिन सहाय्यक जिल्हाधिकारी म्हणून रूजू झालेल्या श्रीमती पूजा खेडकर यांची अखेर उचलबांगडी करण्यात आली आहे. वाशिम जिल्ह्यामध्ये त्यांची बदली करण्यात आली आहे. वरिष्ठ अधिकाऱ्याचे अँटी चेंबर बळकावल्यापासून ते खासगी गाडीवर अंबर दिवा आणि महाराष्ट्र शासन लिहिले, असे आरोप त्यांच्यावर करण्यात आले आहेत.
काय आहे तक्रार ?
कोणत्याही आयएएस, आयपीएस अधिकाऱ्याला दोन वर्षांचा प्रोबेशनचा कार्यकाळ पूर्ण करावा लागतो. या काळात संबंधित अधिकाऱ्यांना विविध विभागांमध्ये काम करावे लागते. त्यानंतर कामाचा अनुभव आल्यानंतर प्रत्यक्ष नियुक्ती केली जाते. याप्रमाणेच IAS असलेल्या डॉ. पूजा दिलीप खेडकर यांना 3 जून 2024 पासून पुण्यातील जिल्हाधिकारी कार्यालयात परिवाक्षाधिन सहायक जिल्हाधिकारी म्हणून पाठवण्यात आले होते. मात्र, आता याच खेडकर यांच्याविरोधात पुण्याचे जिल्हाधिकारी असलेल्या दिवसे यांनी मुख्य अप्पर सचिवांकडे पत्र लिहित अहवाल सादर केला आहे. यामध्ये खेडकर यांची प्रशिक्षणासाठी दुसऱ्या जिल्ह्यात नियुक्ती करावी, तसेच त्यांच्या वडिलांची वर्तवणूक चुकीची असल्याचे म्हणत व्हॉट्सअप चॅटचे फोटोदेखील जोडले आहेत.
डॉ. पूजा खेडकर यांची पार्श्वभूमी काय ?
पुजा या 2023 बॅचच्या आयएएस (IAS) अधिकारी असून, गेल्या जून महिन्यात त्यांना प्रशिक्षणार्थी म्हणून पुणे जिल्हा देण्यात आला होता. परंतु नियुक्तीपासूनच त्यांनी अधिकाऱ्यांकडे वेगवेगळ्या मागण्या सुरू केल्या होत्या. त्या अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी येथील माजी सनदी अधिकारी दिलीप खेडकर यांच्या कन्या आहेत. त्यांचे आजोबा (आईचे वडील) जगन्नाथराव बुधवंत हे आयएएस अधिकारी होते. तर, वडील दिलीप खेडकर हे प्रदूषण विभागाचे आयुक्त राहिलेले आहेत. सेवानिवृत्त झाल्यावर वंचितच्या पाठिंब्यावर ते अहमदनगर दक्षिणमधून यंदाची लोकसभा निवडणूक लढले आहेत. तर, आई डॉ. मनोरमा खेडकर या भालगावच्या लोकनियुक्त सरपंच आहेत.