लक्ष्मण हाकेंच्या घरी चूल बंद, लेकरू उपाशी असताना आम्हाला घास कसा गोड लागेल?; आईचे डोळे पाणावले

0

ओबीसींच्या लढ्यासाठी वडीगोद्री येथे लक्ष्मण हाके यांचे उपोषण सुरू असताना. दुसरीकडे सांगोला तालुक्यात हाके यांच्या जुजारपुर येथील घरी चार दिवसापासून चूल पेटली नाही. लक्ष्मण हाके यांच्या वृद्ध आई वडिलांना अश्रू अनावर झाले आहेत. हाके यांच्या आईची तब्येत बरी नसल्याने आईला येऊ नकोस असा निरोप मुलगा लक्ष्मण हाके यांनी दिल्याचे सांगताना तिला अश्रू अनावर होत आहेत . तो अस्वस्थ असून त्याच्या पोटात अन्नाचा कण नसताना आम्हाला कसे अन्न गोड लागेल असा सवाल या वृद्ध माऊलीने केला .

सरकारने दखल घेऊन त्याची मागणी लवकरात लवकर पूर्ण करावी ही आमची मागणी आहे. माझ्या लेकाची अवस्था बघून मला थंडी- ताप भरला आहे. सरकार का दखल घेत नाही, हेच आम्हाला कळत नाही. अठरापगड जातीला न्याय मिळाला पाहिजे. त्यांच्या तब्येतीसाठी आमचा जीव खालीवर होत आहे. त्यामुळे माझ्या लेकाची मागणी लवकर पूर्ण करा, अशी मागणी हाकेंच्या आई वडिलांनी केली आहे.

अधिक वाचा  बौद्धजन पंचायत समिती शाखा क्र. ७४१ च्या वतीने ६९ वा धम्मचक्र प्रवर्तन दिन उत्साहात साजरा

पोटच्या गोळ्याची अवस्था पाहून आईचा जीव तुटतोय

एक एकराच्या तुकड्यावर आपली उपजीविका करणाऱ्या हाके यांचे वडील शेळ्या मेंढ्या राखायचे काम करतात. त्यांनाही मुलाची अवस्था पाहून चिंता वाटत असून तो समाजासाठी लढत असताना सरकार का लक्ष देत नाही असा सवाल त्यांनी केला. आपल्या मुलांच्या चिंतेत हाके कुटुंबीय असून त्यांच्या पाठीशी आता राज्यभरातील ओबीसी समाज उभा राहत असल्याचे दिसत आहे . आज जुजारपुर गाव कडकडीत बंद करून गावात लाक्षणिक उपोषण सुरू करण्यात आले आहे. मराठा समाजाप्रमाणे सरकारने आपल्या मुलाच्या उपोषणाची दखल घ्यावी, अशी आर्त हाक लक्ष्मण हाके यांच्या आई वडिलांची आहे.

अधिक वाचा  सांगलीत काय घडतंय? रात्रीत साखर कारखान्याचे नाव बदलून जत संस्थानच्या राजाच्या नावाचा फलक; आमदार पडळकरांनी दिला होता इशारा

लक्ष्मण हाकेंच्या उपोषणाचा आज आठवा दिवस

ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्या आंदोलनाचा आजाचा आठवा दिवस आहे दरम्यान हाकेंची प्रकृती पुन्हा खालावली आहे. उच्च रक्तदाबामुळे त्यांना हृदयविकाराचा धोका उद्भवू शकतो अशी भीती डॉक्टरांनी व्यक्त केलीये. त्यामुळे त्यांना तातडीने उपचार घेण्याची गरज असल्याचं मत डॉक्टरांनी व्यक्त केलंय. मात्र हाकेंनी उपचार घेण्यास नकार दिलाय.