भारतीय जनता पक्षाने राज्यातील नेतृत्वाची खांदेपालट केल्यानंतर पिढ्यानपिढ्या भारतीय जनता पक्षामध्ये निष्ठावान कार्य करणाऱ्या नेत्यांना फाटा देण्याचे काम अनेक पातळीवरील राज्य प्रतिनिधींनी केल्यामुळे राज्यातील ओबीसी समुदाय नाराज झाला होता आणि त्याचा फटका लोकसभा निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाला बसला. देवेंद्र फडणवीस यांनी पंकजाताई मुंडे यांना खासदारकी देणे गरजेची आहे अशी घेतलेली भूमिका आणि काल रात्री दिल्लीत झालेल्या एका ज्येष्ठ नेत्याची अमित शहा यांच्याबरोबरची भेट यामुळे भारतीय जनता पक्षामध्ये ओबीसी चेहऱ्यांचे कमबॅक? अशी चर्चा होते की काय अशी चर्चा सुरू झालेली आहे. राज्यातील मराठा समुदाय लोकसभा निवडणुकीप्रमाणे विधानसभेतही भारतीय जनता पक्षाच्या विरोधी भूमिका घेण्याची शक्यता लक्षात घेऊन भारतीय जनता पक्षाने ओबीसी समुदायाला आपल्या सोबत घेण्याची मोठी आखणी केली असल्याचे सुतेवाच या दोन घटनांतून येत आहे.






उमेदवाराचा पराभव झाल्यानंतर भयावह स्थिती
बीड लोकसभा मतदारसंघांमध्ये पंकजाताई मुंडे यांचा पराभव झाल्यानंतर काही काळ नाराजी असणे साहजिक होते परंतु हा पराभव फक्त बीड पुरता मर्यादित नसून संपूर्ण ओबीसी समुदायाला भारतीय जनता पक्षातून दूर फेकले जात असल्याची भूमिका असल्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रातून या पराभवाविषयी चिंता व्यक्त केली गेली. निवडणुकीत हार जीत असतेच परंतु पंकजाताई मुंडे यांचा पराभव हा जातीय समीकरणामुळे झाला? हा एकट्या पंकजाताई मुंडे यांचा पराभव नसेल संपूर्ण ओबीसी समुदायाचे नेतृत्व करणाऱ्या नेत्याचा पराभव आहे अशी भूमिका संपूर्ण महाराष्ट्रात निर्माण झाली. राज्यातील ओबीसी चेहऱ्यांना योग्य स्थान देणं हे भारतीय जनता पक्षाच्या दृष्टीने प्रमुख प्राप्त झाले आहे. आगामी विधानसभा निवडणुकीला सामोरे जाताना भारतीय जनता पक्षाकडे आश्वासक ओबीसी चेहरा असणे काळाची गरज लक्षात घेऊन केंद्रीय नेतृत्वानेच राज्यातील जुने जाणते आणि निष्ठावान दोन ओबीसी चेहरे एकनाथ खडसे आणि पंकजा मुंडे यांना पुन्हा केंद्रस्थानी आणण्याचा निर्णय घेतला असल्याची चर्चा सध्या सुरू आहे.
यामुळं भेटीला आले महत्व
काल रात्री केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे आणि ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. ही सदिच्छा भेट असल्याचे सांगण्यात येत आहे. एकनाथ खडसे लवकरच भाजप मधे प्रवेश करणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत त्या पार्श्वभूमीवर भेटीला महत्व आले आहे. यापूर्वी सुद्धा लोकसभा निवडणुकीच्या धामधुमीतही दोन्ही नेत्यांची भेट झाली होती.
खडसे राष्ट्रवादीत, सून भाजपमध्ये
एकनाथ खडसे हे सध्या शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आहेत. तर त्यांची सून रक्षा खडसे या भाजपमध्ये आहेत. त्यांनी नुकताच लोकसभा निवडणुकीत विजय मिळवला. नाथाभाऊंच्या आशीर्वादाने त्यांनी निवडणुकीत चमकदार कामगिरी केली. त्यांना केंद्रीय राज्यमंत्रीपद देण्यात आले आहे. त्यानंतर आता या भेटीनंतर खडसे यांचा पक्ष प्रवेश निश्चित मानल्या जात आहे.
नाथाभाऊ हे भाजपचे जुने नेते. मध्यंतरी पक्षातील कुरबुरी वाढल्यानंतर त्यांनी वेगळा निर्णय घेतला. पण भाजपचा पिंड त्यांना काही सोडवेना. त्यांनी यापूर्वीच भाजपमध्ये जाणार असल्याचे उघड केले होते. त्यानंतर आता त्यांची घरवापसी जवळपास पक्की समजण्यात येत आहे. नाथाभाऊंच्या भाजप प्रवेशाचा मार्ग मोकळा झाल्याचे चित्रसमोर येत आहे. केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे आणि ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी काल रात्री घेतली केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. त्यामुळे त्यांच्या पक्षप्रवेशावर शिक्कामोर्तब झाल्याचे बोलले जात आहे.











