महाराष्ट्र विधान परिषदेच्या ११ जागा रिक्त होत असून, त्यासाठी निवडणुकीत विधानसभेचे आमदार मतदान करतात. सध्यस्थितीत महायुतीकडे आमदारांची संख्या मोठी आहे. दुसरीकडे ठाकरेंच्या शिवसेनेचे आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार कमी आहेत, त्यामुळे जागा राखता येणार का? त्यामुळे या निवडणुकीत कुरघोड्या होण्याची चिन्हे आहेत. विधान परिषद निवडणुकीसाठी 23 मतांचा कोटा जाहीर करण्यात आला असून शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांनी जर संयुक्त उमेदवार उभा केला तर बिनविरोध होणारी निवडणूक नवा ट्वीष्ट निर्माण करणार आहे.






विधान परिषदेच्या विधानसभेतून निवडून द्यायच्या ११ जागांसाठी निवडणूक जाहीर झाली आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फाटाफूट झाल्याने उमेदवार निवडून आणण्यासाठी मतांची जुळवा जुळव करण्याचे आव्हान असणार आहे. महत्त्वाचे म्हणजे जागा राखताना ठाकरे-पवारांचा कस लागणार आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार या पक्षाकडे दोन्ही संख्याबळ कमी आहे. मात्र, दोन्ही पक्षानी एकच उमेदवार दिला, तर निवडून येऊ शकतो. असं असलं तरी ठाकरे-पवारांची रणनीती काय असणार आणि महाविकास आघाडीकडून किती उमेदवार निवडून आणण्याचा प्रयत्न होणार, हेही महत्त्वाचं आहे. डॉ. मनीषा कायंदे अनिल परब यांची मुदत संपली असून यापैकी अनिल परब हे पदवीधर मधून पुन्हा निवडणुकीच्या रिंगणात आहेत. विधानसभेची आगामी गणित लक्षात घेता उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांना शेकापचे जयंत पाटील यांना पुन्हा निवडून आणणे गरजेचे आहे; उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्यामार्फत संयुक्तपणे जयंत पाटील यांना संधी मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही.
11 जागा रिक्त होत असून, ५ जागा निवडून आणण्याचा भाजपचा प्रयत्न आहे. दुसरीकडे शिंदेंची शिवसेना आणि अजित पवारांची राष्ट्रवादीही प्रत्येकी 2 जागा निवडून आणण्याच्या प्रयत्नात आहे. अब्दुलाह खान दुराणी यांना पुन्हा संधी देण्याची राष्ट्रवादीमध्ये शक्यता आहे. तर भारतीय जनता पक्षमार्फत पुन्हा महादेव जानकर यांना संधी देऊन धनगर समाजाला प्रतिनिधित्व देण्याची शक्यता ही नाकारता येत नाही. आमदारांचे संख्याबळ बघता महायुतीकडून 9 जागा जिंकण्याचे प्रयत्न होऊ शकतात. काँग्रेस पक्षाच्या वतीने ही 2 आमदार जाहीर करण्याची शक्यता आहे. काँग्रेस पक्षाच्या वतीने ही माजी खासदार राजीव सातव यांच्या पत्नी प्रज्ञा सातव यांना पूर्णवेळ आमदारकी देण्याची शक्यता आहे.
उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख २ जूलै आहे. अर्ज मागे घेण्याची तारीख ५ जुलै असून, १२ जुलै रोजी मतदान होणार आहे. सकाळी ९ ते दुपारी ४ वाजेपर्यंत मतदान होणार असून, १२ जुलै रोजीच सायंकाळी ५ वाजता निकाल जाहीर केला जाणार आहे.











