राष्ट्रवादी अजित पवार गटाचे मंत्री छगन भुजबळ हे पुन्हा एकदा नाराज असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. त्यातच आता छगन भुजबळ यांनी मुंबईत तातडीने समता परिषदेची राज्यस्तरीय बैठक बोलावली. वांद्रेमधील एमईटी संस्थेच्या संकुलात ही बैठक होत आहे. या बैठकीदरम्यान छगन भुजबळ यांनी ओबीसी आंदोलक मंगेश ससाणे आणि लक्ष्मण हाके यांच्याशी फोनवरून संपर्क साधत त्यांच्या तब्येतीची विचारपूस केली.






मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळू नये यासाठी जालन्यातील वडीगोद्री गावात ओबीसी नेते लक्ष्मण हाके आणि त्यांचे सहकारी नवनाथ वाघमारे तर मागील 4 दिवसांपासून मंगेश ससाणे यांचे पुण्यात उपोषण सुरु आहे. ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का लागणार नाही याची लेखी हमी सरकारने द्यावी या मागणीसाठी आमरण उपोषण केले जात आहे. चार-पाच दिवसांपासून उपोषण सुरु असल्याने उपोषणकर्त्यांची तब्येत खालावत आहे.
समता परिषद आंदोलकांच्या पाठीशी
या पार्श्वभूमीवर समता परिषदेच्या बैठकीत अॅड. मंगेश ससाणे आणि लक्ष्मण हाके यांच्या तब्येतीबाबत मंत्री छगन भुजबळ यांनी माहिती घेतली. या दोघांशीही भुजबळांनी फोनवरून संपर्क साधला आणि समता परिषद पाठीशी असल्याचे आश्वासन उपोषणकर्त्यांना देण्यात आले. दोघांनीही तब्येतीची काळजी घ्यावी, अशी विनंती भुजबळांनी यावेळी केली. ओबीसी प्रवर्गातून कोणत्याही परिस्थितीत मराठा समाजाला आरक्षण नको, या आंदोलकांच्या भूमिकेशी आम्ही देखील ठाम आहोत, अशीही चर्चा फोनवरून झाल्याची माहिती मिळत आहे.
भुजबळ काय निर्णय घेणार?
मागील काही दिवसांपासून छगन भुजबळ यांच्या नाराजीच्या चर्चा अनेकदा समोर आल्या आहेत. नाशिक लोकसभेतून माघार घेतल्यानंतर भुजबळांची नाराजी पहिल्यांदा दिसून आली. त्यानंतर भुजबळांकडून महायुतीला अडचण निर्माण होईल, अशी वक्तव्य अनेकदा करण्यात आली. अलीकडेच झालेल्या राज्यसभा निवडणुकीसाठी छगन भुजबळ इच्छुक होते. मात्र उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांना राज्यसभेची उमेदवारी मिळाली. यानंतर पुन्हा एकदा भुजबळांच्या नाराजीच्या चर्चा रंगल्या आहेत. त्यातच आता भुजबळांनी समता परिषदेची मुंबईत तातडीची बैठक बोलावली. या बैठकीनंतर भुजबळ काही घोषणा करणार का? भुजबळ कुठला मोठा निर्णय घेणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.










