लोकसभा निवडणुकीनंतर आता शहरांमध्ये विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहे. हातात किमान शंभर दिवस राहिल्याने सर्वच इच्छुक उमेदवारांनी आता रणशिंग फुटण्यास सुरुवात केली आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादी फुटल्यानंतर इच्छुकांना अनेक पक्षांच्या पर्याय उपलब्ध झाल्यामुळे विद्यमान आमदारांपुढे आपल्या पक्षांतील माजी नगरसेवकांना शांत करण्याचे कडवे आव्हान असणार आहे. मुळात पुणे शहरात काँग्रेस आणि राष्ट्रवादी या पक्षाचे प्राबल्य रोखण्यासाठी भारतीय जनता पक्षाने चार सदस्य प्रभाग रचना करून नगरसेवकांचे ‘भाऊबल’ वाढवले असून याच वाढलेल्या मतदारांच्या संख्येच्या बळावर किमान 40% नगरसेवकांना आता आमदारकीची स्वप्न पडू लागली आहेत. पुण्यातील सहा विधानसभा मतदारसंघात इच्छुकांमध्ये मोठी चुरस वाढणार आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकात सुमारे 2वर्षांपासून रखडल्या आहेत. लोकसभा निवडणुकीनंतर विधानसभेचीही चर्चा सुरू झाली. त्यानंतरच महानगरपालिकेच्या निवडणुका होतील, असा अंदाज आहे.
पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीला उशीर होत आहे. त्यामुळे माजी नगरसेवकांच्या राजकीय भवितव्य धोक्यात येण्याची भीती आहे. यातूनच आता सर्वच राजकीय पक्षांतील आजी-माजी नगरसेवकांनी आगामी विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याची तयारी सुरू केल्याचे दिसून येत आहे. काहींनी तर आपापल्या मतदारसंघावर दावा सांगितला आहे. राष्ट्रवादी आणि शिवसेना फुटल्याने आमदारकीच्या इच्छुकांना राजकीय पक्षांचे पर्याय वाढलेले आहेत. परिणामी विधानसभा निवडणुकीत पक्षापक्षांतील उमेदवारांची तिकिट मिळवतानाच कसोटी लागणार आहे.
कोथरूड मतदारसंघाचे प्रतिनिधित्व भाजपचे आमदार चंद्रकांत पाटील करत आहेत. या विधानसभेत त्यांना मनसे, राष्ट्रवादी, शिवसेना आणि काँग्रेसच्या माजी नगरसेवकांकडून पुन्हा एकत्र मोठे आव्हान देण्याची शक्यता आहे. त्यातच भारतीय जनता पक्षाचे काही नगरसेवकही पक्षांतर करून तिकीट मिळवण्याच्या प्रयत्नात असलेल्याची चर्चा मतदारसंघात आहे.
खडकवासला विधानसभेत भाजपचे भीमराव तापकीर आमदार आहेत. यांच्यासह आता भाजपकडून माजी नगरसेवक दिलीप वेडेपाटील तयारीला लागले आहेत. तर राष्ट्रवादीचे विकास दांगट, सचिन दोडके आणि राष्ट्रवादीचे बाळू धनकवडे यांनीही तिकिट मिळण्यासाठी जोरदार फिल्डिंग लावली आहे.
पर्वती विधानसभा मतदारसंघाच्या भाजपच्या नेत्या माधुरी मिसाळ आमदार आहेत. येथून भाजपचे माजी नगरसेवक श्रीनाथ भिमाले आता तयारी करत आहेत. काँग्रेसकडून माजी नगरसेवक उल्हास आबा बागुल यांनी इच्छा व्यक्त केली आहे. त्यांना काँग्रेसने लोकसभेचे तिकिट नाकारले होते. तर राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या अश्विनी कदम आणि राष्ट्रवादीचे सुभाष जगताप विधानसभेची तयारी करत आहेत.
पुणे कॅन्टोन्मेंटचे भाजप आमदार सुनील कांबळे हे पुन्हा निवडणूक लढवण्यास इच्छुक आहेत. तर काँग्रेसचे माजी आमदार रमेश बागवे आणि त्यांचा मुलगा अविनाश हेही येथून दावा सांगण्याची शक्यता आहे.
शिवाजीनगरचे आमदार सिद्धार्थ शिरोळे पुन्हा भाजपकडून रिंगणात उतरण्याच्या तयारीत आहेत. भारतीय जनता पक्षाचे या भागातील माजी नगरसेवक ही चेहराबदल या तत्त्वावर ती दावा करत आहेत. तर काँग्रेसकडून माजी नगरसेवक दत्ता बहिरट यांनी मैदान मारण्याचीही तयारी सुरू केलेली आहे.
कसबा विधानसभा मतदारसंघात माजी नगरसेवक हेमंत रासणे, धीरज घाटे आणि गणेश बिडकर हे भाजपच्या तिकिटासाठी इच्छुक आहेत. तर काँग्रेसकडून विद्यमान आमदार रवींद्र धंगेकर यांच्यासह माजी नगरसेवक व शहर काँग्रेसचे प्रमुख अरविंद शिंदे यांनीही तयारी सुरू केलेली आहे.
वडगावशेरी मतदारसंघात राष्ट्रवादीचे सुनील टिंगरे आमदार आहेत. आता त्यांना आरपीआय (ए) चे सिद्धार्थ धेंडे, शिवसेनेचे अजय भोसले, भाजपचे जगदीश मुळीक आणि बापू पठारे यांच्या आव्हानाचा सामना करावा लागणार आहे.
हडपसरमधून राष्ट्रवादीचे चेतन तुपे आमदार पुन्हा मैदानात असणार आहेत. त्यांच्याविरोधात शरद पवार गटाचे नेते माजी नगरसेवक प्रशांत जगताप, योगेश ससाणे आणि वसंत मोरे यांचे तगडे आव्हान असणार आहे.