शिवसेनेत बंड करून 40 आमदारांना बरोबर घेऊन बाहेर पडणाऱ्या आणि मुख्यमंत्रिपद घेणाऱ्या एकनाथ शिदि यांच्या शिवसेनेच्या पुणे शहर प्रमुखाचे कोणीच ऐकत नसल्याचं समोर आलं आहे. कारण, गंगाधाम मार्केटयार्ड येथील रस्त्यांवर होणारे अपघात टाळण्यासाठी या रस्त्यावर अवजड वाहनांना बंदी करावी, अशी मागणी यापूर्वी देखील अनेकदा करून त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. आता याकडे प्रशासनाने दुर्लक्ष केल्यास रस्त्यावर उतरण्याची तयारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे शिलेदार नाना भानगिरे यांनी केली आहे.






मार्केटयार्ड जवळील गंगाधाम रस्त्यावर अग्निशमन दलाच्या कार्यालयासमोर बुधवारी एका भरधाव डंपरने दुचाकी वरून जात असणाऱ्या दोन महिलांना चिरडले. यामध्ये एका महिलेचा आगीच मृत्यू झाला, तर दुसरी महिला गंभीर जखमी झाली. अशा भीषण अपघातामुळे या परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे, याकडे शिवसेना शिंदे गटाचे शहर प्रमुख प्रमोद उर्फ नाना भानगिरे यांनी लक्ष वेधले आहे.
या परिसरात मोठ्या प्रमाणावर गृहप्रकल्पाची कामे सुरु असल्यामुळे बांधकाम साहित्य घेऊन येणारे ट्रक, डंपर या रस्त्यावरून भरधाव वेगाने जातात. या रस्त्यावरून जाताना तीव्र चढ़ उतार आहे. तसेच हा रस्ता अरुंद असल्यामुळे तिथे अवजड वाहनांवर बंदी घालण्यात आली होती. मात्र, अवजड वाहनांसंदर्भात नव्याने आदेश काढल्यानंतर बाहतूक शाखेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सांगण्यानुसार तेथील रस्त्याच्या वाहतुकीवरील निर्बंध उठविण्यात आले. त्यामुळे रस्त्यावर अपघातांच्या मालिका सुरु झाल्या आहेत, असा आरोप भानगिरे यांनी केला आहे.
या रस्त्यावर होणाऱ्या अपघातांबाबत वारंवार वाहतूक पोलीस तसेच आरटीओ यांच्याकडे पाठपुरावा करून देखील काहीही उपाययोजना केल्या जात नसल्याचेही भानगिरे यांनी सांगितले, या रस्त्यावर होणारे अपघात टाळण्यासाठी आणि वाहतूक सुरळीत व्हावी, यासाठी तातडीने या रस्त्यावर जड वाहनांना बंदी घालावी यासाठी भानगिर यांनी प्रादेशिक परिवहन विभागाला निवेदन दिले आहे.
आरटीओ ने याबाबत तातडीने निर्णय घेऊन योग्य ती अंमलबजावणी न केल्यास नागरिकांच्या हितासाठी रस्त्यावर उतरून आंदोलन करण्यास मागेपुढे पाहणार नाही, असा इशारा देखील भानगिरे यांनी दिला आहे. दरम्यान, राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे खादे समर्थक म्हणून भानगिरे यांची ओळख आहे. त्यांनाच आंदोलन करायची वेळ येत असेल तर इतरांनी काय करावे, असा प्रश्न विचारला जात आहे.












