महाराष्ट्रात पुन्हा ऑपरेशन धनुष्यबाण सुरू असल्याची चर्चा आहे. ठाकरेंच्या शिवसेनेच्या खासदारांवर शिंदेंच्या शिवसेनेची नजर असल्याची माहिती आहे. उद्या केंद्रीय गृहमंत्री अमित शाह ठाकरेंच्या शिवसेनेच्या काही खासदरांसोबत चर्चा करण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. दरम्यान ठाकरेंचे काही खासदर संपर्कात असल्याचा दावा शिंदेंच्या शिवसेनेकडून करण्यात येतोय.
शिवसेना शिंदे गट आणि शिवसेना ठाकरे गटाचा आज मेळावा होणार आहे. आजच्या शिंदे गटाच्या मेळाव्यात कोणताही मोठा पक्षप्रवेश होणार नसल्याची माहिती आहे. दरम्यान माजी खासदार आणि शिंदे गटाचे नेते राहुल शेवाळे यांनी आज मोठा राजकीय भूकंप (Maharashtra Politics) होणार असल्याचं भाकित केलं होतं. मात्र ठाकरे गटातील खासदारांच्या पक्षप्रवेशांवर तांत्रिक अडचणींच्या शक्यतेमुळे शिंदे गटाने सध्या वेट अँड वॉचची भूमिका घेतल्याचीही चर्चा आहे.
विधीमंडळ माजी सचिव अनंत कळसे काय म्हणाले?
ठाकरे गटाचे 9 खासदार आहेत. युबीटीचे 9 खासदार आहेत, महाराष्ट्रात पूर्वी देखील बघितलं आहे, 10 च्या सूची अंतर्गत आपण महाराष्ट्रात ॲंटीडिफेक्शन लॉ केलाय. 1985 आधी 1/3 फुटण्याची तरतूद होती, मात्र आता 2/3 आणि ते ही विलिनीकरण करण्याची तरतूद आहे. वेगळा गट स्थापन करून ते विलीन होऊ शकतील. वेगळा गट शिवसेनेत विलीन झाला पाहिजे अशी तरतूद कायद्यात आहे. पण ते 6 खासदार असतील तरच हे होईल. पक्षातून काही आमदार वेगळे झाले होते आणि आमचाच मूळ पक्ष आहे आणि निवडणूक आयोगाने त्यांना मान्यता दिली त्यानंतर सर्वोच्च न्यायालयात प्रकरण गेलं. पक्षांतर विरोधी कायद्यानुसार गट स्थापन होत किंवा 6 खासदार शिवसेनेत विलीन करावे लागतील.
सहा खासदारांहून कमी असले तर अपात्रतेची कारवाई-
सहा खासदारांहून कमी असले तर अपात्रतेची कारवाई त्यांच्यावर होईल आणि खासदारकी जाईल. सहा किंवा जास्त असेल तरच मर्जरची प्रोव्हिजन होऊन प्रक्रिया होऊ शकेल. राजीनामा देत निवडणुकीला सामोरे जाणं हा एक उत्तम पर्याय आहे. मात्र, आत्ताचा कायदा देखील चांगल्या प्रकारे इन्टरप्रिट झालेला नाही. कायद्याच्या इन्टरप्रिटेशन संदर्भात सर्वोच्च न्यायालयाने निर्णय घेतला पाहिजे मात्र कोर्टात सुनावणी पेंडिंग आहे. कायद्याचा अर्थ नीट लावला गेला तर अनेक प्रश्न सुटू शकतील. यासंदर्भात नार्वेकर यांनी कमिटी देखील स्थापन केली होती. जर फाटाफूट पुन्हा झाली तर एखाद्या पक्षाला सुप्रिम कोर्टात जावं लागेल तेव्हा कायदा कसा इन्टरप्रिट सर्वोच्च न्यायालय करतो हे महत्त्वाचे असेल, अशी अनंत कळसे यांनी माहिती दिली.
आज शिवसेनेचा मेळवा-
दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्तानं आज पुन्हा एकदा दोन शिवसेनेचे दोन मेळावे पाहायला मिळतील. उद्धव ठाकरेंच्या नेतृत्त्वाखालील शिवसेनेच्या वतीनं आज अंधेरीत महामेळाव्याचं आयोजन करण्यात आलं आहेत.. त्यात पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची जाहीर सभा होणार आहे. त्याचवेळी मुंबईतल्या बीकेसी परिसरात शिंदेंच्या शिवसेनेचा विजयोत्सव साजरा होणार आहे. एकनाथ शिंंदेंच्या नेतृत्त्वाखाली विधानसभा निवडणुकीत मिळालेल्या यशाचं आज बाळासाहेबांच्या जयंतीनिमित्तानं सेलिब्रेशन करण्यात येईल.