भाजपच्या गडात ठाकरे गटाचा शिरकाव; मतांमुळे दुप्पट वाढ, विधानसभेसाठी रणनीती बदलण्याची वेळ

0

भाजपचा बालेकिल्ला अशी ओळख असलेल्या नाशिक पूर्व मतदारसंघात महायुतीचे उमेदवार हेमंत गोडसे यांना अल्पशी आघाडी मिळाली असली, तरी ‘मविआ’चे खासदार राजाभाऊ वाजेंच्या पारड्यातही भरभरून मतदान झाले. त्यामुळे विधानसभेवेळी महायुतीला रणनीती बदलावी लागणार आहे.

गेल्या वेळी या मतदारसंघात समीर भुजबळ यांना अवघी ४० हजार मते मिळाली असताना यंदा मात्र वाजेंनी ९० हजारांपर्यंत मजल मारली आहे. या मतदारसंघात ग्रामीण भागाचाही समावेश असल्याने गोडसे पिछाडीवर जाण्याचा धोका होता. मात्र, आमदार राहुल ढिकले यांनी प्रचाराची धुरा हातात घेतल्याने गोडसेंना १० हजारांचे का होईना मताधिक्य मिळाल्याने भाजपलाही दिलासा मिळाला आहे.

अधिक वाचा  कोथरूड वाढत्या गुन्हेगारीस आळा घालून गतवैभव पुन्हा प्राप्त करून द्या; राष्ट्रवादी तर्फे  कोथरूड पोलिसांना यांना निवेदन

गेल्या दोन लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांपासून शहरातील नाशिक पूर्व, नाशिक पश्चिम, नाशिक मध्य हे तीन शहरी मतदारसंघ महायुतीचा गड बनले आहेत. गेल्या दोन विधानसभांपासून भाजपचे आमदार या मतदारसंघांतून निवडून येत असल्यामुळे गोडसेंचा विजय आतापर्यंत सुकर होत होता. मात्र, यंदा निकालातून शहरी मतदारांनी गोडसेंची साथ सोडल्याचे चित्र आहे. त्यात भाजपसाठी गेल्या दोन विधानसभा निवडणुकांसाठी गड बनलेल्या नाशिक पूर्व मतदारसंघाचाही समावेश आहे. शहरी आणि ग्रामीण भाग असे मिश्रण या मतदारसंघात आहे.

मखमलाबाद ते नाशिकरोडपर्यंत विस्तार असलेल्या या मतदारसंघात मराठा, ओबीसी, दलित, गुजराती मतदारांचे प्रमाण अधिक आहे. दर बारा वर्षांनी भरणाऱ्या सिंहस्थाचे ठिकाण असल्यामुळे या भागात विधानसभा असो, की महापालिका निवडणुका त्यात भाजपचेच वर्चस्व राहिले आहे. हिंदुत्वाला मानणारा मोठा वर्ग या मतदारसंघात असल्याने गेल्या दोन विधानसभांपासून येथे भाजपचाच आमदार निवडून येत आहे. गेल्या विधानसभेवेळी भाजपने बाळासाहेब सानप यांच्याऐवजी राहुल ढिकले यांना उमेदवारी दिली. त्यावेळीही मतदारांनी भाजपच्याच बाजूने कौल दिला होता. त्यामुळे यंदाही गोडसेंना भरभरून मतदान होईल, अशी अपेक्षा होती. परंतु, ती फोल ठरली.

अधिक वाचा  मतदार याद्या सुधारणेसाठी १ नोव्हेंबरला रस्त्यावर विरोधक उतरणार; विरोधकांकडून मोर्चाचे हत्यार