नरेंद्र मोदींची दिल्लीत पुन्हा सत्ता येणार असली तरी महाराष्ट्राने मात्र त्यांना नाकारले आहे. राज्यात तब्बल 18 सभा आणि एक रोड शो घेतला. पण मागील निवडणुकीत 23 खासदार असलेल्या भाजपला यावेळी 2अंकी आकडाही गाठता आला नाही, तर महायुतीलाच 17 जागांवर समाधान मानावे लागले आहे. महाराष्ट्रात मोदींच्या सभांना नेत्यांनी गर्दी खेचून आणली असली तरी मतदार केंद्रांपर्यंत मतदारांना आणता आले नाही. ईव्हीएम मशीनचे बटन दाबताना मतदारांच्या डोक्यात मोदींचा करिष्मा नव्हताच, हे स्पष्ट झाले आहे.
महायुतीने मोदींच्या अधिकाधिक सभा घेण्यासाठी धडपड केली होती. नेत्यांच्या भाषणांमध्ये मोदींचाच बोलबाला होता. पण मतदारांच्या मनात वेगळेच चालले होते, हे निकालानंतर स्पष्ट झाले आहे. मुंबईपासून विदर्भापर्यंत मोदींनी ज्या ठिकाणी सभा घेतल्या, तिथे बहुतेक ठिकाणी मोदींच्या उमेदवारांचा पराभव केला.
मुंबई-कोकण
लोकसभा निवडणुकीआधी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मुंबईत अनेक चकरा झाल्या. तर प्रचारादरम्यान शिवाजी पार्कवर मोदींच्या उपस्थितीत महायुतीची विराट सभा झाली. उत्तर मध्य मतदारसंघात मोदींचा रोड शो झाला. पण वा मतदारसंघासह मुंबईतील सहापैकी चार मतदारसंघात महायुतीला केवळ दोनच जागा मिळू शकल्या. मुंबई उत्तरमधून पियुष गोयल तर उत्तर पश्चिम ममतदारसंघातून रविंद्र वायकर यांचा काठावर विजय झाला. महायुतीसाठी हा मोठा झटका मानला जात आहे.
कोकणात मात्र महायुतीला चांगले यश मिळाले. विशेष म्हणजे कल्याण वगळता कोकणात मोदींची एकही सभा झाली नाही. सिंधुदुर्गमध्ये नारायण राणे, रायगडमध्ये सुनिल तटकरे, कल्याणमध्ये श्रीकांत शिदि तर ठाण्यात नरेश म्हस्के यांचा विजय झाला.
पश्चिम महाराष्ट्र- 3 विजयी
मोदींनी पुण्यासह बारामती, शिरूर आणि मावळ अशा चार लोकसभा मतदारसंघांतील महायुतीच्या उमेदवारांसाठी रेसकोर्सवर सभा घेतली होती. या सभेला आलेला अलोट जनसागर पाहून मोदी गदगदून गेले होते. पण पुणे जिल्ह्यातही महायुतीला पुणे आणि मावळ या दोनच जागा मिळू शकल्या.
मोदींची सातारा, माढा, सोलापूर, कोल्हापूरमध्येही सभा झाल्या. या चारपैकी केवळ सातारा मतदारसंघात महायुतीला यश मिळाले. सातारामध्ये उदयनराजे भोसले, माढचात धैर्यशील मोहिते पाटील, सोलापूरात प्रणिती शिंदे आणि कोल्हापूरमध्ये शाहू महाराजांचा विजय झाला.
उत्तर महाराष्ट्र- महायुतीची दाणादाण
उत्तर महाराष्ट्रातही महायुतीची दाणादाण उडाली. मोदींनी अहमदनगर, नाशिक, दिंडोरी, नंदुरबारमध्ये सभा घेतल्यानंतरही तिन्ही मतदारसंघात महायुतीचा दारूण पराभव झाला. नगरमध्ये सुजय विखेंना राष्ट्रवादीच्या निलेश लंकेंनी पराभूत केले. नाशिकमध्ये हेमंत गोडसेंचा एक लाखांहून अधिक मतांनी पराभव झाला. दिंडोरीमध्ये केंद्रीय राज्यमंत्री भारती पवार यांनाही दारूण पराभवाचा सामना करावा लागला. शरद पवारांच्या राष्ट्रवादीने त्यांचा एक लाखांहून अधिक मतांनी पराभव केला. नंदुरबारमध्ये हिना गावित यांचा पराभवही धक्कादायक होता. मोदींचा करिष्मा इथेही चालला नाही, कोग्रेसचे गोवाल पाडवी यांचा दीड लाखांहून अधिक मतांनी विजय झाला.
मराठवाडा-मोदींची जादू कामी नाहीच
मराठवाड्यातही मोदींची जादू कामी आली नाही. बीड, लातूर, नांदेड, परभणी, धाराशीव (उस्मानाबाद) या पाच मतदारसंघात महायुतीच्या उमेदवारांसाठीही मोदींच्या सभा झाल्या. पाचही ठिकाणी पराभवाचा सामना करावा लागला आहे. अनुक्रमे पंकजा मुंडे, सुधाकर श्रृंगारे, प्रताप चिखलीकर, महादेव जानकर आणि अर्चना पाटील यांना पराभवाची चव चाखावी लागली.
विदर्भ मोठा दणका
विदर्भात महायुतीला मोठा दणका बसला आहे. हा भाजपचा गड मानला जातो. पण केवळ नागपूर आणि अकोला वगळता सर्व आठ जागांवर महाविकास आघाडीचे उमेदवार विजयी झाले आहेत. चंद्रपूर, रामटेक, वर्धा या मतदारसंघात मोदींच्या सभा झाल्या होत्या. तिन्ही ठिकाणी महायुतीच्या उमेदवारांचा पराभव झाला. चंद्रपूर राज्यातील मंत्री सुधीर मुनगंटीवार, वर्ध्यात रामदास तडस आणि रामटेकमध्ये राजू पारवे पराभूत झाले.