धक्कादायक! २दशकांत सर्वाधिक ‘पुण्यात’ तापमानवाढ: यामुळे शहरी भूपृष्ठ तापमान वाढले: आयआयटीचे संशोधन

0
1

पुणे : जागतिक तापमानवाढीच्या तुलनेत भारतातील शहरांमध्ये शहरीकरणामुळे तापमानवाढ अधिक झाली आहे, असा निष्कर्ष ‘आयआयटी, भुवनेश्वर’च्या शास्त्रज्ञांनी काढला आहे. या प्रकारच्या तापमानवाढीत देशातील २० मोठ्या शहरांमध्ये पुणे पहिल्या क्रमांकावर आहे. गेल्या दोन दशकांत देशातील १४१ शहरांमध्ये तापमानवाढीची नोंद झाली आहे.

सौम्या सेठी आणि व्ही. विनोज यांनी केलेले हे संशोधन ‘नेचर सिटीज’ या विज्ञान पत्रिकेत नुकतेच प्रकाशित झाले आहे. जगातील एकूण क्षेत्रफळाच्या फक्त एक टक्का भूभागावर शहरे वसलेली असली, तरी त्यामध्ये सुमारे अर्धी लोकसंख्या राहते. सन २०५०पर्यंत शहरी लोकसंख्येचे प्रमाण ६८ टक्क्यांपर्यंत पोचण्याचा अंदाज आहे. अशा स्थितीत शहरीकरणाचा हवामानावर आणि पर्यायाने मानवी आरोग्यावर विपरीत परिणाम होऊ नये म्हणून धोरणकर्त्यांनी आधीच नियोजन करणे गरजेचे आहे, असे शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे.

अधिक वाचा  आता ओबीसी आक्रमक सरकारने दोन आदेश लागू केले या निर्णयाचा अभ्यास करूनच लढाईची दिशा – भुजबळ

अभ्यास कसा केला?

‘आयआयटी, भुवनेश्वर’मधील शास्त्रज्ञांनी २००३ ते २०२० या कालावधीसाठी देशातील १४१ शहरांमधील रात्रीचे भूपृष्ठाचे तापमान (नाईट लँड सरफेस टेम्परेचर- एनएलएसटी) उपग्रहीय नोंदींच्या साह्याने तपासले. या सर्वच शहरांमध्ये प्रत्येक दशकात ०.५३ अंश सेल्सिअस या दराने तापमानवाढ दिसून आली. या काळात देशभरातील सार्वत्रिक तापमानवाढीचा दर ०.२६ अंश सेल्सिअस होता. याचा अर्थ शहरांमध्ये इतर भागांपेक्षा दुप्पट तापमानवाढ होत आहे. शहरीकरणामुळे झालेली तापमानवाढ प्रादेशिक तापमानवाढीपेक्षा जास्त असल्याचे आढळले आहे.

दहा लाख लोकसंख्येपेक्षा जास्त लोकसंख्या असलेल्या शहरांमधील तापमान आणि त्यांच्या लगतच्या ग्रामीण भागांचे तापमान यांची तुलना केली असता, मोठ्या शहरांमध्ये निमशहरी किंवा ग्रामीण भागांच्या तुलनेत ६० टक्के जास्त तापमानवाढ दिसून आली. काही प्रदेशांमध्ये सर्वसाधारण तापमान कमी होत असताना, त्या प्रदेशांमधील शहरांमध्ये मात्र तापमानवाढ होत असल्याचे आढळले.

अधिक वाचा  संविधानाच्या माध्यमातून पंचशीलेला कायद्याचे अधिष्ठान प्राप्त झाले आहे – विनोद मोरे

शहरीकरणामुळे होणाऱ्या तापमानवाढीमध्ये पुणे देशात पहिल्या क्रमांकावर असल्याचे या संशोधनात समोर आले आहे. पुण्यात प्रत्येक दशकात रात्रीचे भूपृष्ठाचे तापमान ०.५५ अंशांनी वाढत असून, सहाव्या क्रमांकावरील नाशिकमध्ये ०.४१; तर तेराव्या क्रमांकावरील नागपूरमध्ये ०.३३ अंश सेल्सिअस इतक्या दराने रात्रीचे भूपृष्ठाचे तापमान वाढत आहे.

शहरी तापमानवाढीची कारणे

– मोठ्या प्रमाणात झालेले काँक्रीटीकरण आणि इमारतींची रचना

– दिवसा सूर्याकडून मिळालेली उष्णता जमिनीकडून रात्री पुन्हा उत्सर्जित केली जाते.

– काँक्रिटीकरणामुळे ही उष्णता मातीपेक्षा कमी दराने उत्सर्जित होते.

– शहरभर पसरलेले काँक्रिटचे रस्ते, इमारतींचे छत, काचेच्या भिंती तापल्यामुळे शहरांत उष्णतेच्या बेटांसारखी स्थिती (हिट आयलंड इफेक्ट) तयार होते.

अधिक वाचा  भाजपकडून राजकीय सोयीसाठी प्रभागरचनेत नियमांचे उल्लंघन; काँग्रेस-राष्ट्रवादीचा संयुक्त पत्रकार परिषदेत आरोप

– उष्णतेच्या बेटांचा थेट परिणाम स्थानिक तापमान, पाऊस, प्रदूषण यावर होतो.

भूपृष्ठाच्या तापमानवाढीचा दर यादीतील पहिली दहा शहरे

(कंसात रात्रीच्या भूपृष्ठाच्या तापमानवाढीचा दर अंश सेल्सिअसमध्ये)

पुणे (०.५५), रायपूर (०.५१),

जयपूर (०.४९), अहमदाबाद (०.४५),

पाटणा (०.४३), नाशिक (०.४१),

लुधियाना (०.४१), लखनौ (०.४०),

बेंगळुरू (०.४०), बडोदे (०.३९)