पश्चिम महाराष्ट्र मध्ये गुलाल कोणाचा? यांची धाकधूक वाढली तर येथे उत्साहाचे वातावरण पहा सविस्तर…

0
1

राज्यातील लोकसभा निवडणुकीसाठी पहिल्या तीन टप्प्यात जवळपास 24 जागांसाठी मतदान पार पडले. उर्वरित दोन टप्प्यात 24 जागांसाठी मतदान होणार असून मंगळवारी तिसऱ्या टप्प्यातील 11 जागांसाठी मतदान पार पडले. त्यानंतर आता सर्वच पक्षांच्या नेतेमंडळीकडून आतापासूनच निकालाबाबत दावे-प्रतिदावे केले जात आहेत. त्यामुळे सर्वच जणांची धाकधूक वाढली आहे.

लोकसभा निवडणुकीच्या निकालासाठी 4 जूनपर्यंत प्रतीक्षा करावी लागणार असली तरी सर्वांना उत्सुकता लागून राहिली आहे. या 10 जागांचा कल काय असणार, याविषयी विश्लेषक हेमंत देसाई यांनी विश्लेषण केले आहे. यामध्ये विशेष म्हणजे बारामती लोकसभा मतदारसंघाचे विश्लेषण करणे राजकीय विश्लेषकांनी टाळले आहे कारण बारामतीचा अंदाज कदाचित कोणालाच लागत नाही? किंवा घटलेला मतदानाचा टक्का आणि संभ्रमित प्रचार यंत्रणा राबवणारे कार्यकर्ते यामुळे राजकीय विश्लेषकही निशब्द झाले आहेत असे चित्र आहे.

सातारा
सातारा मतदारसंघ हा राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला मानला जातो. साताऱ्यातून राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार सातत्याने निवडून येतात. यशवंतराव चव्हाण यांचा वारसा लाभलेल्या या मतदारसंघावर शरद पवार यांचे वर्चस्व राहीले आहे. मात्र, सातारा मतदारसंघात शशिकांत शिंदे यांची बाजू वरचढ दिसत आहे. त्यामुळे उदयनराजे यांना फटका बसण्याची शक्यता आहे. गेल्या निवडणुकीत निवडून आल्यानंतर त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. त्यामुळे त्यांना यापूर्वी एकदा पराभव स्वीकारावा लागला होता.

अधिक वाचा  भाजपकडून राजकीय सोयीसाठी प्रभागरचनेत नियमांचे उल्लंघन; काँग्रेस-राष्ट्रवादीचा संयुक्त पत्रकार परिषदेत आरोप

कोल्हापूर
कोल्हापूरकर शाहू महाराजांना साथ देऊन गादीचा मान राखतील, असा त्यांचा अंदाज आहे. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात मतदान झाले आहे. त्याचा फायदा विद्यमान खासदार संजय मंडलिकऐवजी शाहू महाराजांना होईल असे वाटते. बाणाच्या तुलनेत या ठिकाणी हात जोरात चालला आहे.

हातकणंगले
हातकणंगले येथे माविआचे सत्यजित पाटील हे महायुतीच्या धैर्यशील माने यांना जड जातील, असा अंदाज आहे. माने यांनी गेल्या पाच वर्षात मतदारसंघात काम केले नसल्याने त्यांच्या विषयी नाराजी आहे. त्याचा फटका त्यांना बसू शकतो. या ठिकाणी होत असलेल्या तिरंगी लढतीत मशाल बाजी मारणार आहे.

लातूर
लातूरमध्ये काँग्रेसकडून रिंगणात उतरलेले शिवाजीराव काळगे या नव्या चेहऱ्याला वाव आहे. या ठिकाणी विद्यमान खासदार सुधाकर शुंगारे यांना दुसऱ्यांदा संधी मिळण्याची शक्यता कमी दिसत आहे. त्यांच्या विरोधात मतदारसंघात मोठ्या प्रमाणात नाराजी दिसली. शहरी भागात जरी कमळ चालले असले तरी ग्रामीण भागात हाताचा जोर होता. त्यामुळे काळगेना या ठिकाणी संधी आहे.

अधिक वाचा  ‘समस्त कोथरूड’ने देखाव्यांची ‘संस्कृती’च बदलली; सर्वत्र जिवंत देखावे अन् पौराणिक मंदिरे

धाराशिव
धाराशिवमध्ये ओमराजे निंबाळकर यांचे काम चांगलं आहे. त्यामुळे जनता त्यांच्या पाठीशी उभी राहील असे चित्र आहे. त्यांच्यापुढे अर्चना पाटील नवख्या ठरल्या आहेत. त्यामुळे निंबाळकर यांना पुन्हा संधी मिळेल, असे दिसते. या ठिकाणी प्रथमच घडाळ्याच्या तुलनेत मुस्लिम बहुल भागात मशाल मोठ्या प्रमाणात चालली आहे.

सांगली
सांगली मतदारसंघात तिरंगी लढत झाली. हेच कुणाला पचनी पडलेले दिसत नाही. या ठिकाणी संजय पाटील व विशाल पाटील यांना समान संधी असणार आहे. महविकास आघाडीचे चंद्रहार पाटील काहीसे बॅकफूटवर आहेत.

सोलापुर
सोलापुरात प्रणिती शिंदे यांना राजकीय वारसा असला तरी गरीब कुटूंबातून राजकारणात आलेले राम सातपुते त्यांना चांगली लढत देऊ शकतात. याठिकाणी सातपूते यांनी अभाविपचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात कामाला लावले होते. त्याचा फायदा त्यांना होऊ शकतो.

अधिक वाचा  जगाने भगवान बुद्धांना आद्य संशोधक व सुपर सायंटिक्स म्हणून मान्य केले – संदीप गमरे

माढा
माढ्यात यंदा धैर्यशील मोहिते पाटील यांना संधी मिळू शकेल, असा अंदाज आहे. या ठिकाणी मोहिते-पाटील कुटुंबाच्या बाजूने मतदार राहतील, असे वाटते. विद्यमान खासदार रणजित नाईक निंबाळकर यांच्या अडचणीत या निवडणुकीच्या सुरुवातीपासूनच दिवसेंदिवस वाढ होत असल्याचे जाणवते.

रायगड
रायगडमध्ये यंदा सुनील तटकरे पुन्हा निवडून येण्याची शक्यता कमी आहे. त्याठिकाणी माजी खासदार अनंत गीते पुन्हा बाजी मारतील असे वाटते.

रत्नागिरी-सिंधुदुर्ग
रत्नागिरी-सिंधुदुर्गमध्ये नारायण राणे यांचा करिश्मा चालणार नाही. अमित शाह यांनी याठिकाणी औरंगजेब फॅन्स क्लब हा केलेला शब्दप्रयोग त्यांना मुस्लिम मतांपासून दूर ठेवेल असे चित्र आहे. त्यामुळे या ठिकाणी विनायक राऊत हॅटट्रिक करतील, असे चित्र जाणवत आहे, असे विश्लेषक हेमंत देसाई यांनी स्पष्ट केले.

हा जरी दहा जागांचा कल असला तरी या सर्वच मतदारसंघातील अंतिम निकाल जाहीर होण्यासाठी येत्या ४ जूनची वाट पाहवी लागणार असल्याने तोपर्यंत उत्सुकता कायम असणार आहे.