बारामतीत ‘जरांगे फॅक्टर’ ची एंट्री? 400 किमी अंतर कापून मनोज जरांगे-जय पवार भेटीचं नेमकं गणित काय?

0
3

बारामती लोकसभा मतदारसंघात खासदार सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार अशी कुटुंबातच लढत होत आहे. या लढतीकडे ज्येष्ठ नेते शरद पवार विरुद्ध उपमुख्यमंत्री अजित पवार असेच पाहिले जात आहे. लोकसभेनिमित्त या दोन्ही नेत्यांनी आपली ताकद पणांना लावलेली आहे. या नेत्यांनी छोट्या छोट्या घटकांना आपल्याकडे वळवण्याचे प्रयत्न केले. अडगळीत पडलेल्या जुन्या सहकाऱ्यांना ताकद दिली. अशातच अजित पवार गटाने मोठी चाल खेळली आहे. अजित पवारांचे चिरंजीव जय पवारांनी थेट अंतरवाली सराटी गाठत मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटलांची भेट घेतली. या भेटीमागे बारामतीचे नेमके काय गणित दडले आहे, याचीच चर्चा राजकीय वर्तुळात आहे.

अधिक वाचा  रुणवाल पॅनोरमा सोसायटीत श्रीचरणी कामगार कवी राजेंद्र वाघ यांच्या कविता सादर 

बारामती लोकसभा मतदारसंघात होणार्‍या नणंद-भावजयमध्ये लढतीच्या प्रचाराचा आज रविवारी (ता. 5) शेवटचा दिवस आहे. त्यासाठी शरद पवार  आणि अजित पवारांनी मतदारसंघात सभांचा धडाका सुरू आहे. दुसरीकडे मात्र जय पवारांनी अनपेक्षितपणे मराठा आंदोलनस्थळी जात मनोज जरांगे पाटलांची भेट घेतली. यामुळे राजकीय वर्तुळातून भुवया उंचावल्या आहेत.

मराठा आंदोलक जरांगे पाटलांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जाहीरपणे आरोप केले होते. तसेच मनोज जरांगेंना शरद पवार गटाचे बळ आहे, असेही बोलले जात आहे. त्यातच मनोज जरांगेंविरोधात ओबीसी समाजही सक्रिय झाल्याचे बोलले जात आहे. या साऱ्याचा फटका लोकसभा निवडणुकीत सत्ताधारी पक्षांना बसण्याची चर्चा आहे.

अधिक वाचा  राज्यात ओबीसी उपसमिती काय काम करणार?; उपसमितीची कार्यकक्षाही निश्चित झाली फडणवीसही सरसावले

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडल्यानंतर बारामती लोकसभा मतदारसंघातील मराठा समाजाची भूमिका निर्णायक ठरणारी आहे. पवार कुटुंबातील पडलेल्या उभ्या दरीमुळे बारामतीत जरांगे फॅक्टर स्पष्टपणे दिसत नसला तरी रिस्क घेण्याची कुणाचीही तयारी नाही. यातूनच जय पवारांनी थेट जरांगे पाटलांची भेट घेतल्याचे बोलले जात आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे कुटुंब एकटे पडल्याचे दिसत आहे. सुप्रिया सुळेंच्या प्रचारात सर्व कुटुंब सहभागी झाले आहेत. तर सुनेत्रा पवारांच्या प्रचारात पती अजित पवार, मुलगा पार्थ आणि जय हे सक्रिय असल्याचे दिसत आहेत. या मतदारसंघासाठी 7 मे रोजी मतदान होत आहे. तत्पुर्वीच म्हणजे प्रचाराच्या शेवटच्या टप्प्यात जय पवारांनी थेट जरांगे पाटलांची भेट घेतल्याने तर्कवितर्क लढवले जात आहे.

अधिक वाचा  ‘समस्त कोथरूड’ने देखाव्यांची ‘संस्कृती’च बदलली; सर्वत्र जिवंत देखावे अन् पौराणिक मंदिरे