पुणे : उपमुख्यमंत्री अजित पवार हे पवार कुटुंबावर टीका करण्याची एकही संधी सोडत नसल्याचं मागील काही दिवसांपासून दिसून येत आहे. रोहित पवारांच्या आई सुनंदा पवारदेखील सुप्रिया सुळेंच्या प्रचारात सक्रिय झाल्या आहेत. त्यांनी बारामतीत धनशक्तीचा वापर होणार असल्याचं म्हटलं आहे. त्यावर विचारल्यास मी कोणाच्या प्रश्नाला उत्तर द्यायला बांधिल नाही. आमच्या योग्यतेच्या व्यक्तीच्या प्रश्नांना उत्तर देईन, असं म्हणत अजित पवारांनी सुनंदा पवारांच्या प्रश्नाला उत्तर दिलं आहे. आपल्या आईसंदर्भात असं बोलल्याने रोहित पवार चांगलेच संतापल्याचं पाहायला मिळालं आहे. बरोबर आहे दादा तुमचं… स्वतःच्या अंगावर आलं की भलतीकडं ढकलण्याचा तुम्हाला भाजपाचा संगतगुण लागलाय, असं म्हणत त्यांनी ट्विट करत संताप व्यक्त केला आहे.






त्यासोबतच आम्ही आजपर्यंत तुमचा प्रचार केला तेव्हा आम्ही योग्यतेचे होतो आता योग्यतेचे वाटत नाही, असा हल्लाबोलदेखील रोहित पवारांनी अजित पवारावर केला आहे. शिवाय बाकी सगळे विरोधात असलेले नेते आता तुमच्या योग्यतेचे आहेत, असा टोलाही त्यांनी अजित पवारांना लगावला आहे.
ट्विटमध्ये नेमकं काय लिहिलंय?
रोहित पवारांनी ट्विटमध्ये लिहिलंय की, बारामतीत दहशतीचं वातावरण असल्याच्या आईच्या वक्तव्यावर पत्रकारांनी प्रश्न विचारताच ‘योग्यतेच्या माणसांनी प्रश्न विचारला तर उत्तर देईन’ असं अजितदादा म्हणाले… बरोबर आहे दादा तुमचं… स्वतःच्या अंगावर आलं की भलतीकडं ढकलण्याचा तुम्हाला भाजपाचा संगतगुण लागलाय. आजवर तुमचा प्रचार केला त्यावेळी आम्ही योग्यतेचे होतो पण आज नाही. मिर्चीवाले… महाराष्ट्र सदनवाले… सिंचनवाले… एकाच वेळी दोन-दोन घरं सांभाळणारे… आदिवासी विद्यार्थ्यांच्या दुधातली मलई खाणारे.. मागासवर्गीय विद्यार्थ्यांचं जेवणाचं ताट पळवणारे… हे मात्र तुमच्या लेखी ‘योग्यते’चे आहेत.
पवार विरुद्ध पवार लढाईत ‘हमरी तुमरी’
सुप्रिया सुळेंच्या प्रचारासाठी अख्ख पवार कुटुंब मैदानात उतरलं आहे. त्यात सुनंदा पवारही प्रचार करताना दिसत आहे. त्याभाषणं करताना आणि गावभेटी करताना दिसत आहे. याच दरम्यान अजित पवारांवर पवार कुटुंब टीका करत आहे. त्यासोबतच विरोधात असलेले अजित पवार आणि सुनेत्रा पवारदेखील शरद पवार, सुप्रिया सुळेंवर निशाणा साधताना दिसत आहे.











