दक्षिण मुंबईत दोन शिवसैनिक भिडणार, ठाकरेंच्या अरविंद सावंतांना आव्हान देणाऱ्या यामिनी जाधव कोण?

0

राज्यातील सर्वाधिक प्रतिष्ठेच्या लढतीपैकी एक असलेल्या दक्षिण मुंबईचा तिढा आता सुटला असून महायुतीकडून शिंदे गटाच्या आमदार यामिनी जाधव यांच्या नावाची घोषणा केली आहे. त्यामुळे आता यामिनी जाधव विरुद्ध अरविंद सावंत असे एकेकाळचे सहकारी आणि सध्या वेगवगेळ्या पक्षात असलेले दोन शिवसैनिक एकमेकांना भिडणार आहेत. त्यामुळे दक्षिण मुंबईतील लढतीकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. मुंबईत 20 मे रोजी मतदान होणार आहे.

दक्षिण मुंबईची जागा शिवसेना शिंदे गटाला जाणार की भाजपला जाणार यावर बरीच चर्चा झाली. या जागेसाठी भाजपचा आग्रह होता. त्यामुळेच भाजपचे राहुल नार्वेकर आणि मंगल प्रभात लोढा यांच्या नावाची चर्चा सुरू होती. त्यातच गेल्या काही दिवसांपासून राहुल नार्वेकरांनी प्रचाराला सुरूवात केल्याने ही जागा भाजपलाच जाणार अशी चर्चा होती. पण आता शिवसेना शिंदे गटाने ही जागा आपल्याकडे ठेवण्यात यश मिळवल्याचं दिसतंय.

अधिक वाचा  जैन बोर्डिंग होस्टेल व्यवहाराशी माझा काही संबंध नाही! माहिती न घेता चुकीचे आरोप मोहोळांचा कागदपत्रांसह खुलासा

एकेकाळचे ठाकरेंचे विश्वासू आणि आता शिंदे गटात असलेल्या यशवंत जाधव यांच्या पत्नी, यामिनी जाधव यांना दक्षिण मुंबईतून तिकीट मिळालं आहे. महायुतीने दाखवलेला विश्वास सार्थ करू अशी प्रतिक्रिया यामिनी जाधव यांनी ‘एबीपी माझा’शी बोलताना दिली.

कोण आहेत यामिनी जाधव?

सध्या शिंदे गटात असलेल्या यामिनी जाधव या भायखळा मतदारसंघाच्या आमदार आहेत. एकेकाळी ठाकरेंचे विश्वासू अशी ओळख असलेल्या यशवंत जाधव यांच्या त्या पत्नी आहेत. भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी यशवंत जाधव यांच्यावर आरोप केल्यानंतर त्यांची ईडी चौकशी सुरू झाली होती. एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर यशवंत जाधव यांनी शिंदेंची साथ देण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे त्यांच्यामागे असलेला ईडीचा ससेमिरा काही प्रमाणात थांबल्याचं सध्याचं चित्र आहे.

अधिक वाचा  देशात साखर उद्योग अस्वस्थ इथेनॉल निर्मितीवर ‘संक्रांत’ इथेनॉलची अमेरिकेतून आयात? भविष्याची चिंता

नगरसेविका ते आमदार असा प्रवास

यामिनी जाधव या 2012 साली मुंबई महापालिकेत शिवसेनेच्या तिकिटावर नगरसेविका म्हणून निवडून आल्या. त्यांनी महापालिकेत विविध समित्यांवर काम केलं आणि आपली छाप उमटवली. भायखळा विधानसभा मतदारसंघ हा तसा मुस्लिमबहुल मतदारसंघ आहे. 2014 सालच्या निवडणुकीत या ठिकाणाहून एमआयएमच्या वारिस पठाण यांनी बाजी मारली होती. त्यामुळे 2019 सालच्या निवडणुकीत कोणत्याही परिस्थितीत ही जागा जिंकायचीच असा चंग बांधलेल्या शिवसेनेने यामिनी जाधव यांना तिकीट दिलं. पक्षाचा विश्वास सार्थ ठरवत यामिनी जाधव यांनी वारिस पठाण यांना पराभूत करत विधानसभेत प्रवेश केला.

अधिक वाचा  कोथरूड वाढत्या गुन्हेगारीस आळा घालून गतवैभव पुन्हा प्राप्त करून द्या; राष्ट्रवादी तर्फे  कोथरूड पोलिसांना यांना निवेदन

एकनाथ शिंदेंना साथ, गुवाहाटीवरून ठाकरेंवर टीका

एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर शिवसेनेत फुट पडली. त्यावेळी यामिनी जाधव आणि त्यांचे पती यशवंत जाधव यांनी एकनाथ शिंदे यांना साथ देण्याचा निर्णय घेतला. गुवाहाटीला जाणाऱ्या आमदारांच्या पहिल्या यादीत यामिनी जाधव यांचं नाव होतं.

यामिनी जाधव यांनी गुवाहाटीतून उद्धव ठाकरेंच्या कार्यशैलीवर टीका केली. आपण आजारी असताना उद्धव ठाकरे वा ठाकरे परिवारातील कुणीही आपली विचारपूर केला नसल्याचा आरोप त्यांनी केला होता.