“वाढपी वाढतोय म्हणजे स्वयंपाक एकट्याने केलेला नाही,” राजेंद्र पवारांचा अजित पवारांना टोला

0

आम्ही अजितदादांचा प्रचार केला नाही असं अजिबात नाही, पहिल्या निवडणुकीपासून अगदी सायकलवर फिरुन आम्ही प्रचार केला आहे, त्यामुळे प्रचारच केला नाही हा आरोप योग्य नसल्याचे मत बारामती अ‍ॅग्रोचे अध्यक्ष राजेंद्र पवार यांनी व्यक्त केले. वाढपी वाढतोय म्हणजे स्वयंपाक एकट्यानेच केलेला नाही, असा टोलाही त्यांनी अजित पवारांना लगावला.

सुप्रिया सुळे यांच्या बारामती विधानसभा मतदारसंघाच्या प्रचाराचा प्रारंभ शुक्रवारी (ता. 19) होणार आहे. याबाबत माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत राजेंद्र पवार यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात ही माहिती दिली.

या प्रसंगी सदाशिव सातव, जवाहर वाघोलीकर, अँड. संदीप गुजर, सत्यव्रत काळे, अँड. एस.एन. जगताप, वनिता बनकर, अँड. अशोक इंगुले, प्रियांका शेंडकर, सुभाष ढोले, वीरधवल गाडे आदी उपस्थित होते.

अधिक वाचा  निवृत्तीच्या उंबरठ्यावर नसलेल्या शिक्षकांना ‘टीईटी’ बंधनकारक; सर्वोच्च न्यायालयाचा आदेश, राज्य सरकारची काय भूमिका?

राजेंद्र पवार म्हणाले, छत्रपती कारखान्याच्या निवडणुकीपासून आम्ही प्रचार करतोय, गेल्या निवडणुकीत रोहित पवार कर्जत जामखेडमध्ये उभे होते, त्यामुळे आम्ही तिकडे जोर लावला होता. पण त्याअगोदरच्या निवडणुकीतही आम्ही गाव ते गाव व घर ते घर असा प्रचार केलेला आहे.

एक दोन निवडणुकीत आम्ही नसलो तर गेल्या 35 वर्षातील निवडणुकीतच आम्ही नाही असे ते म्हणणार असतील तर मग काय बोलायच. त्यांच्यासारख्या राज्यस्तरीय नेत्याला मोरगावमध्ये तासभर लोकांशी का बोलाव लागत याचे उत्तर त्यांनीच द्यावे.

नुसती भाषणे देऊन विकास होत नसतो, असा वारंवार आरोप सुप्रिया सुळे यांच्यावर अजित पवारांनी केला, याबाबत विचारत राजेंद्र पवार म्हणाले, जो विकास झाला जो निधी आला तो एकत्रित होता. त्यात शरद पवार व सुप्रिया सुळे यांचाही निधी होताच, कदाचित राज्य सरकारमध्ये असल्याने अजित पवारांचा अधिकचा निधी आला असेल हे मान्य आहे. पण स्वयंपाक सगळ्यांनी मिळून केला होता, वाढप्याकडे वाढायचे काम दिलेले होते, वाढपी वाढतोय याचा अर्थ सगळा स्वयंपाक त्यांनी एकट्यानेच केलाय असा कदाचित त्यांचा समज झाला असावा, असा टोला राजेंद्र पवारांनी अजित पवारांना लगावला.

अधिक वाचा  पुण्यात रात्रीत सर्वात मोठी घडामोड; पवारांची बिन आवाजाची काठी चालली अन् ‘देवाभाऊं’चे मनसुबे उधळले

बारामतीत आम्ही त्यांच्यापेक्षा जास्त राहतो, आम्ही सामाजिक काम करतो ते राजकीय जीवनात कार्यरत आहे, कुटुंबातील घटक म्हणून आम्ही हे स्वीकारलेले होते. त्यांनी राजकीय भूमिका पार पाडायची आम्ही सामाजिक कामे करायची हे ठरलेले होते, याचा अर्थ प्रत्येक वेळेस मीच केले मीच केले असे ते म्हणू शकत नाहीत, असेही त्यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितले.

योग्य वेळ येईल तेव्हा आम्हीही सगळ्या गोष्टींचा खुलासा करु असेही राजेंद्र पवार यांनी या वेळी सांगितले.

तुतारी हे चिन्ह आता गावोगावी पोहोचलेले असून, शरद पवार हा आमचा ब्रँड आहे असे जवाहर वाघोलीकर यांनी सांगितले. पवारांच चिन्ह म्हणून तुतारी ओळखली जाईल, असा विश्वास त्यांनी बोलून दाखविला.

अधिक वाचा  भाजपचा महाराष्ट्रभर झंझावात; पण येथे अख्ख्या पॅनलचं डिपॉझिट जप्त; पक्षाचा आलेला निधी देखील तळापर्यंत गेलाच नाही; प्रदेश पातळीवर मोठी खलबते होणार 

सुप्रिया सुळे यांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी पुण्यात जे कार्यकर्ते येतील ते स्वखर्चाने येतील, प्रामाणिकपणे शरद पवारांच्या विचारांशी जोडलेले कार्यकर्ते आमच्यासोबत आहेत, असे सत्यव्रत काळे यांनी नमूद केले. संदीप गुजर यांनी प्रास्ताविकात उमेदवारी अर्ज भरणे व सभेबाबत माहिती दिली.