राज्यातील माढा लोकसभा मतदारसंघात सध्या विविध राजकीय घडामोडी घडत आहेत. धैर्यशील मोहिते पाटलांनी शरद पवार गटात प्रवेश करण्याचा निर्णय घेतल्यानं भाजपच्या अडचणीत वाढ झालीय. मोहितेपाटील यांना बाजूला ठेवून माढा लोकसभा सर करण्याची भूमिका घेतलेल्या रणजीतसिंह निंबाळकर यांची धाकधूक वाढत आहे. पश्चिम महाराष्ट्र सर करण्यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नेमलेले मोहरे सध्या अडचणीत असताना आपली पकड घट्ट करण्यासाठी हे तिन्ही मोहरे तात्काळ देवेंद्र फडणवीस यांची बैठक घेण्यासाठी नागपूरला खाजगी विमानाने रवाना झाले आहेत.
विशेष म्हणजे रामराजे नाईक निंबाळकर हे देखील खासदार रणजितसिंह निंबाळकर यांच्यावर नाराज आहेत. याचा पार्श्वभूमीवर खासदार रणजितसिंह निंबाळकर, आमदार जयकुमार गोरे आणि आमदार राहुल कुल हे खास विमानाने नागपूरकडे रवाना झालेत. त्यांची उमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत तातडीची बैठक आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांना सत्तेत सहभागी केल्यानंतर पश्चिम महाराष्ट्रातील गणित दिवसेंदिवस जटील होत आहेत. आणि त्याचा फटका देवेंद्र फडणवीस यांच्या समर्थक असलेल्या कार्यकर्त्यांना भोगाव लागत आहे. फडणविस यांनी सांगितल्याप्रमाणे सर्व कार्यकर्ते येथे युतीधर्म पाळण्यास सज्ज झाले असले तरी माढा लोकसभा मतदारसंघांमध्ये युतीधर्म पाळला जात नाही असा आरोप रणजीत सिंह निंबाळकर यांच्याकडून केला जात आहे.
सध्या मित्र पक्षातील सर्व आमदार भाजपा उमेदवार रणजीतसिंह निंबाळकर यांच्या बरोबर असले तरीसुद्धा मतदारसंघातील वातावरण कोणत्याही क्षणी बदलण्याची शक्यता लक्षात घेऊन म्हाडाचे उमेदवार दक्ष झाले असून बारामती ही अजित पवार यांची दुगती रग लक्षात घेऊन त्यांनी माडाचं कनेक्शन बारामतीशी जोडण्यासाठी आपल्याबरोबर दौंडचे आमदार राहुल कुल यांना सोबत घेऊन एक प्रकारे एल्गार करण्याची भूमिका घेतली आहे.
पश्चिम महाराष्ट्रामध्ये सध्या शरद पवार यांच्याबरोबर अनेक विभिन्न विचाराचे लोक एकत्र येत असल्यामुळे पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर 2 सांगली 1 सातारा 1 आणि सोलापूर 2 यासह पुण्यातील 4 लोकसभा मतदारसंघाची गणित दिवसेंदिवस जटील होत आहेत. या भागामध्ये भारतीय जनता पक्षाचे काम करण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांनी एक आपल्या हक्काची टीम तयार केली होती. परंतु यामध्ये सर्वांना न्याय देणे खुद्द देवेंद्र फडणवीस यांना अजित पवार सत्तेत सहभागी झाल्यामुळे शक्य झाले नाही. देवेंद्र फडणवीस यांच्या शब्दाखातर सर्व फडणवीस समर्थक नेत्यांनी युती धर्म पाळण्याचा संकल्प केला असला तरी मित्र पक्षांकडून येथे धर्म पाळला जात नाही अशा तक्रारी वाढत आहेत.
राष्ट्रवादीकडून युतीधर्म पाळला जात नाही
महायुतीत राष्ट्रवादीकडून युतीधर्म पाळला जात नाही. याबाबतची तक्रार खासदार निंबाळकर फडणवीस यांच्याकडे करणार आहेत. माढ्यामध्ये रामराजे नाईक निंबाळकर विरोधी काम करणार असतील तर दौंडमधून बारामतीला मदत होणार नाही अशी आक्रमक भूमिका खासदारांनी घेतल्याची माहिती मिळत आहे. दरम्यान, खासदार रणजितसिंह निंबाळकर, राहुल कुल, जयकुमार गोरे हे फडणवीस यांच्या भेटीला नागपुरात त्यांच्या निवासस्थानी दाखल झाले आहेत. माढा लोकसभा मतदारसंघाच्या अनुषंगाने महत्त्वाची बैठक सुरु झाली आहे. बैठकीनंतर नेमका काय निर्णय होतो, याकडं सर्वाचं लक्ष लागलं आहे.