आयपीएल स्पर्धेच्या इतिहासात आरसीबीला एकदाही जेतेपदावर नाव कोरता आलेलं नाही. मागच्या 16 पर्वात आरसीबीची झोळी रितीच आहे. त्यात वुमन्स प्रीमियर लीग स्पर्धेत आरसीबीने जेतेपदावर नाव कोरल्याने अपेक्षा वाढल्या होत्या. मात्र दिग्गज खेळाडूंचा भरणा असूनही संघाला जेतेपदाचं स्वप्न काही साकारता येत नाही. आयपीएल स्पर्धेत आरसीबी आतापर्यंत एकूण 4 सामने खेळली आहे. त्यापैकी तीन सामन्यात पराभवाचं तोंड पाहावं लागलं आहे. त्यामुळे प्लेऑफच्या दिशेने होणारा प्रवास आणखी किचकट होणार आहे. माजी क्रिकेटपटू अंबाती रायुडू आरसीबीचं जेतेपदाचं स्वप्न का पूर्ण होत नाही याचं कारण सांगितलं आहे. रायुडूने सांगितलं की, आरसीबीतील दिग्गज खेळाडू दबावावेळी युवा खेळाडूंना पुढे करतात. स्वत: वर फलंदाजी करतात आणि युवा खेळाडूंना मिडल ऑर्डरमध्ये पाठवतात.






चेन्नई सुपर किंग्ससाठी शेवटची लीग मॅच खेळलेल्या अंबाती रायुडूने सांगितलं की, “मला असं वाटतं की, गोलंदाज कायम ठरलेल्या चेंडूपेक्षा जास्त धावा देतात. त्यामुळे फलंदाज दबावात कामगिरी करतात. जेव्हा आरसीबी दबावात असते तेव्हा कोणतं मोठं नाव खेळताना दिसत नाही. त्यामुळे हा संघ कधीही जिंकत नाही. याचमुळे गेल्या वर्षात या संघाला जेतेपद मिळवता आलेलं नाही.”











