लातूर काँग्रेसचा उमेदवार जाहीर झाल्यानंतर आता खऱ्या अर्थाने प्रचाराला सुरुवात झाली आहे. गेल्या तीन लोकसभा निवडणुकांपासून या मतदारसंघात काँग्रेसला विजयाचा गुलाल लागलेला नाही. यावेळी लातूर जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्ग, रेल्वे, विमानतळ, पाणी असे प्रश्न सरकार दरबारी अडकले आहेत. आयआयटी, आयआयएम सारख्या संस्था लातूरात उभ्या राहिल्या पाहिजेत, तरुणांना रोजगार मिळाला पाहिजे. यासाठी दिल्लीत आपला वाढती पाठवू असे आवाहन लातूर ग्रामीणचे काँग्रेस आमदार धीरज देशमुख यांनी केले.
अशा महत्त्वाच्या विषयांना वाचा फोडून त्याची सोडवणूक करण्यासाठी आपल्या विचाराचे खासदार संसदेत असले पाहिजेत. डॉ. शिवाजी काळगे यांच्या रूपाने आपण आपल्या हक्काचा वाढपी दिल्लीत पाठवून लातूरसाठी अधिकाधिक विकासकामे खेचून आणू, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
लातूर लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार डॉ. शिवाजी काळगे यांच्या उपस्थितीत लातूर ग्रामीण विधानसभा मतदारसंघात ग्रामस्थ, पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते यांचा संवाद मिळावा मंगळवारी (ता.26) पार पाडला. पानगाव, कोष्टगाव, कारेपूर, खरोळा या गावांत बैठका घेण्यात आल्या. तर घनसरगाव, मुरढव, पाथरवाडी, दिवेगाव, रामवाडी (ख) आदी गावांना भेटी देण्यात आल्या.
लातूर काँग्रेसचा उमेदवार जाहीर झाल्यानंतर आता खऱ्या अर्थाने प्रचाराला सुरुवात झाली आहे. गेल्या तीन लोकसभा निवडणुकांपासून या मतदारसंघात काँग्रेसला विजयाचा गुलाल लागलेला नाही. यावेळी मात्र भाजपाला हॅट्रिक पासून रोखत हा मतदारसंघ खेचून आणण्याचे मोठे आव्हान काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांसमोर असणार आहे.
आमदार अमित देशमुख, धीरज देशमुख आणि त्यांचे मार्गदर्शक काका माजी मंत्री दिलीपराव देशमुख यांनी आता लोकसभा निवडणुकीची सूत्रे आपल्या हाती घेतली आहेत. देशमुख बंधूंनी आपापल्या मतदारसंघात काँग्रेस उमेदवार शिवाजी काळगे यांच्या प्रचारासाठी बैठकांचा धडाका सुरू केला आहे. आमदार धीरज देशमुख यांनी दिवंगत नेते विलासराव देशमुख यांच्या एका विधानाची आठवण कार्यकर्त्यांच्या बैठकीत करून दिली.
दिल्लीत आपला वाढपी असावा, असे विलासराव नेहमी सांगायचे. लातूरच्या विकासासाठी आपला वाढपी पाठवूया, असे आवाहन त्यांनी केले. ‘वाढपी हा आपल्या हक्काचा असला पाहिजे.’ असे विलासराव देशमुख सांगत असत. त्या दृष्टीने आपण कामाला लागून लातूरची जागा मोठ्या मताधिक्याने विजयी करून दाखवू असेही ते म्हणाले.
ही केवळ निवडणूक नसून ही लढाई आहे, वाढत्या बेरोजगारी विरोधात, वाढत्या महागाई विरोधात. लोकशाहीचे संरक्षण करण्यासाठीचा हा लढा आहे. त्यामुळे सर्वांनी सजग रहावे. शेतकरी, महिला, विद्यार्थी, युवक यांच्यासाठी केंद्र सरकारने गेल्या 10 वर्षांत काहीही केले नाही.
काँग्रेसच्याच जुन्या योजनांची नावे बदलून त्या नव्याने राबवल्या. एम. एस. स्वामिनाथन यांना भारतरत्न दिले; पण त्यांच्या सूचनांकडे पाठ फिरवली. शेतकऱ्यांचे म्हणणेही ऐकून घेतले नाही. त्यामुळे जनता सरकारच्या कारभाराला वैतागली आहे. काँग्रेस सर्वांना बरोबर घेवून जाणारा पक्ष आहे. त्यामुळे काँग्रेसच आजच्या अडचणीच्या काळात सामान्यांना न्याय देईल, असा जनतेला ठाम विश्वास वाटत आहे.
म्हणून पक्षाच्या कार्यकर्त्यांनी, पदाधिकाऱ्यांनी पक्षाची ध्येयधोरणे, पक्षाचे काम अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवावे, असे आवाहनही धीरज देशमुख यांनी केले. लोकसभेची ही निवडणूक देशाला दिशा देणारी, विकासाची नवी दृष्टी देणारी आहे. ही एक वैचारिक लढाई आहे. त्यामुळे सर्वांना सोबत घेऊन जाणाऱ्या काँग्रेस पक्षाला आपण बळ द्यावे, असेही ते म्हणाले.