देशभरात लोकसभा निवडणुकीचे बिगुल वाजलं आहे. निवडणुका म्हटलं की मतदारांना आकर्षित करण्यासाठी प्रत्येक पक्षाकडून भरमसाठ आश्वासनं दिली जातात, तर अनेकदा कार्यकर्त्यांना खूष करण्यासाठी त्यांना जेवण दिलं जातं. इतकंच काय तर नेत्यांच्यामागून फिरण्यासाठी कार्यकर्त्यांच्या गाड्यांमध्ये पेट्रोल टाकण्याचे पैसेदेखील उमेदवारांकडून दिले जातात, हे सर्वांना माहिती असणारं उघड गुपित आहे. त्यामुळे राजकीय पक्षांकडून निवडणुकांवर होणाऱ्या या अमर्याद खर्चावर नियंत्रण ठेवण्यासाठी निवडणूक आयोगाकडून नियमावली दिली जाते.
याच पार्श्वभूमीवर लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीमध्ये उमेदवारांचा निवडणूक खर्च निर्धारण करण्यासाठी वर्धा जिल्हाधिकारी कार्यालयात राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींची बैठक जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी राहुल कर्डिले यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली होती. या बैठकीमध्ये दैनिक, साप्ताहिक, अर्ध साप्ताहिक, वस्तूंचे दर, नगरपालिका व ग्रामीण क्षेत्रातील जाहिरात फलक, वाहने, बल्क एसएमएस तसेच स्थानिक केबलचे दर निश्चित करण्यात आले आहेत. या बैठकीत निवडणूक प्रचार व प्रसिद्धीसाठी वापरण्यात येणाऱ्या प्रत्येक बाबीचे दर निश्चित करण्यात आले आहेत.
या बैठकीत निश्चित केलेले वस्तूंचे दर खालीलप्रमाणे
शामियाना मंडप प्रतिदिन प्रतिस्क्वे. फूट 130 रुपये, साधा मंडप प्रतिदिन प्रतिस्क्वे. फूट 4 रुपये, लाकडी स्टेज प्रतिदिन प्रतिस्क्वे. फूट 250 रुपये, कमान प्रतिदिवस प्रतिनग 2500 रुपये, लाकडी पोडियम प्रतिदिवस 250 रुपये, VIP खुर्ची प्रतियुनिट 30 रुपये, स्पीकर बाॅक्स, ॲम्पिफायर माइकसह प्रतिदिवस 1500 रुपये, भोंगे ॲम्पिफायर व माइकसह प्रतिदिवस 1000 रुपये, माइक प्रतिदिवस 30 रुपये, एलसीडी टीव्ही प्रतिनग प्रतिदिवस 800 रुपये, DVD प्लेअर प्रतिनग प्रतिदिवस 1250 रुपये, जनरेटर 25 किलोवाॅट प्रतिदिवस 3000 रुपये, जनरेटर 50 किलोवाॅट प्रतिदिवस 4000 रुपये, जनरेटर 100 किलोवाॅट प्रतिदिवस 5000 रुपये, एलईडी स्क्रिनसाठी वाहन प्रतिदिवस 3500 रुपये, हॅलोजन व्हाइट फोकस 500 वाॅट प्रतिदिवस 50 रुपये, सीसीटीव्ही कॅमेरा (4 कॅमेरा) प्रतिदिवस 100 रुपये.
व्हेज जेवण थाळी 100 रुपये, नॉनव्हेज जेवण थाळी 150 रुपये, नाश्ता 35 रुपये, पोहा प्रतिप्लेट 25 रुपये, चहा प्रतिकप 10 रुपये, कॉफी प्रतिकप 20 रुपये, दूध प्रतिकप 15 रुपये, वॉटरकॅन 20 लिटर प्रतिकॅन 30 रुपये, पाणी बॉटल एक लिटर प्रतिनग 20 रुपये, पाणी पाऊच 5 रुपये नग, निवडणूक प्रतिनिधी प्रतिव्यक्ती मानधन 600 रुपये, मतदान प्रतिनिधी प्रतिदिवस 700 रुपये, घरपोच प्रचार मानधन प्रतिव्यक्ती 600 रुपये, 10 बाय 10 आकाराचे ऑफिस भाड्याने 10 हजार रुपये, बँड, ढोल, ताशा 5 हजार.
जाहिरात फलक, होर्डिंगचे दर
खासगी जागेवरील जाहिरात होर्डिंगसाठी प्रतिचौ. फूट 30 रुपये, तर सार्वजनिक व शासकीय जागेवरील होर्डिंगसाठी प्रतिचौ. फूट 60 रुपये. स्वागत गेट मंडप परवाना शुल्क 200 रुपये तसेच जागाभाडे प्रतिदिन प्रतिचौ. फूट 2 रुपये, बोर्ड, बॅनर, पुलावरील व भिंतीवरील केलेल्या जाहिराती परवाना शुल्क 200 तसेच मनपाद्वारे निश्चित सार्वजनिक जागेवर, जागाभाडे प्रति चौ. फूट प्रतिदिन 3 रुपये, खासगी जागेवर प्रतिचौ. फूट प्रतिदिन 1.50 रुपये, तर जिल्हा माहिती कार्यालय आणि केंद्र शासनाच्या माहिती व प्रसारण मंत्रालयामार्फत दैनिक, साप्ताहिक, टीव्ही चॅनेल, रेडिओ यांना देण्यात येणाऱ्या जाहिरातींचे दरही निश्चित करण्यात आले आहेत. दरम्यान, शासनाने ठरवून दिलेल्या दरातच राजकीय उमेदवार खर्च करणार की ते हा नियम मोडणार हे पाहणंदेखील महत्त्वाचं आहे.