लाडकी बहीण योजनेवरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरु आहेत. लाडकी बहीण योजनेचा हप्ता न वाढवल्याने विरोधकांकडून सत्ताधाऱ्यांवर टीका केली जात आहे.विरोधकांच्या टीकेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. लाडक्या बहिणींना केवळ १५०० रुपये देऊन शांत बसायचं नाही. तर त्यांना लखपती दीदी बनवायचं आहे, असं विधान करत मुख्यमंत्र्यांनी विरोधकांना प्रत्युत्तर दिलं आहे.






मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज वर्धा दौऱ्यावर आहेत. वर्ध्यात एका कार्यक्रमाला मुख्यमंत्र्यांनी हजेरी लावली. या कार्यक्रमानंतर माध्यमांशी संवाद साधताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लाडकी बहीण योजनेवर मोठं भाष्य केलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, ‘आम्हाला आमच्या लाडक्या बहिणींना केवळ पंधराशे रुपये देऊन शांत बसायचं नाही. तर त्यांना लखपती दीदी बनवायचं आहे. त्यांचं सक्षमकरण करायचं आहे. आमचं लक्ष्य आहे की, एक कोटी बहिणींना लखपती दीदी बनवणार आहे. याकरिता प्रत्येक जिल्ह्यात स्पर्धा सुरु आहे’.
आरटीओ कार्यालयावर मुख्यमंत्री काय म्हणाले?
‘वर्धेत अकरा टक्के आदिवासी राहतात. त्यांना लहान लहान कामासाठी नागपूरला जावा लागत होते म्हणून आरटीओ कार्यालय मंजूर केले होते. आधी भाड्याच्या खोलीत कार्यालय होते. आता सुसज्ज इमारत झाली. 2019 साली सांगितलं होतं की, मी पुन्हा येईल. तेव्हापासून इमारत वाट पाहत होती. इमारतीचं आज लोकार्पण झालं, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.
‘वर्धा जिल्ह्यात पंचवीस टक्क्यांनी अपघाताची संख्या कमी झाली आहे. यासाठी परिवहन विभागाच अभिनंदन. परिवहन मंत्री वर्धेचे भूमिपुत्र आहे. त्यांना तुम्ही पन्नास बस मागितल्या. पण त्यांना शंभर मागितल्या असत्या तरी दिल्या असत्या. कारण सरनाईक यांची जन्मभूमी असून या भूमीपेक्षा काही मोठं नसतं. वर्धा बाजार समितीच्या कामांना मंजुरी दिली आहे. या जिल्ह्याच्या विकासाकरिता मागितलं ते देऊ, असे ते म्हणाले.











