निवडणूक पार्ट्यांवर ‘एक्साईज’ची करडी नजर! ढाबे, हॉटेलवर मद्यपान नकोच; अन्यथा ही कारवाईही अन् दंड

0
1

लोकसभेसाठी उमेदवारी अर्ज भरायला १२ एप्रिलपासून सुरवात होणार आहे. त्यानंतर ढाब्यांवरील पार्ट्या रंगतील. अशा पार्ट्यांवर लक्ष ठेवण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाने विशेष पथके नेमली आहेत. त्यांच्याकडून विनापरवाना मद्यपान करणाऱ्यांसह ढाब्यांवरील मद्यपी व ढाबा मालक-चालकांवर कारवाई होईल. कारवाईनंतर ढाबा चालकाला २५ हजार तर मद्यपींना पाच हजारांपर्यंत दंड भरावा लागू शकतो, असा इशारा अधीक्षक नितीन धार्मिक यांनी दिला आहे.

निवडणूक म्हटले की दारू अन्‌ पैसा या दोन गोष्टींची नेहमीच चर्चा असते. त्यावर लक्ष ठेवण्यासाठी पोलिस व जिल्हा प्रशासनाकडून विशेष पथके नेमली आहेत. वास्तविक पाहता कोणालाही कोणत्याही ठिकाणी मद्यपान करता येत नाही. दुसरीकडे परमीट रूम, बिअरबारशिवाय कोठेही दारू, वाइन, बिअरची विक्रीही करता येत नाही. मद्यपींकडे आजीवन किंवा एक वर्षाचा परवाना बंधनकारक असून परवानाधारक मद्यपींनी परमीट रूममध्येच मद्यपान करणे आवश्यक आहे.

अधिक वाचा  ओबीसींसाठी उपसमिती गठीत, चंद्रशेखर बावनकुळे अध्यक्ष छगन भुजबळ, पंकजा मुंडेंसह बडे मंत्री सदस्य

नियम मोडणाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल होऊन त्यांना अटक करून न्यायालयात नेले जाते. न्यायालयाच्या माध्यमातून संबंधितांवर दंडात्मक कारवाई होते. राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून आता निवडणूक काळात अशाप्रकारच्या कारवाई केल्या जाणार आहेत. परराज्यातून सोलापूर जिल्ह्यात येणाऱ्या विदेशी-देशी व गावठी दारू वाहतूक व विक्रीवर देखील लक्ष राहील, असेही श्री. धार्मिक यांनी स्पष्ट केले.

 ‘या’ क्रमाकांवर तक्रार शक्य 

जिल्ह्यात कोणत्याही गावात अवैध दारू विक्री, मद्यपान, हातभट्टी दारुची निर्मिती व विक्री, वाहतूक होत असल्यास कोणत्याही नागरिकास १८००२३३९९९९ या टोल फ्री क्रमांकावर तर ८४२२००११३३ या व्हॉट्‌सॲप क्रमांकावर तक्रार करता येईल. राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून त्याठिकाणी छापा टाकून कारवाई केली जाईल, असे अधीक्षक नितीन धार्मिक यांनी ‘सकाळ’शी बोलताना स्पष्ट केले.

अधिक वाचा  जगाने भगवान बुद्धांना आद्य संशोधक व सुपर सायंटिक्स म्हणून मान्य केले – संदीप गमरे

विनापरवाना मद्यपान करणाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल होणार

ढाब्यांवर मद्यपान किंवा मद्यविक्री करता येणार नाही. मद्यपान करणाऱ्या प्रत्येकाकडे त्यासंबंधीचा परवाना बंधनकारक आहे. विनापरवाना मद्य खरेदी करणारे, परमीट रुमशिवाय कोणत्याही ठिकाणी मद्यपान करणारे, विनापरवाना मद्य घेऊन जाणारे कारवाईसाठी पात्र राहतील. निवडणूक काळात ढाबे, हॉटेलवरील पार्ट्यांवर आमच्या पथकांचे लक्ष राहणार असून त्याठिकाणी मद्यपान करणाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल करून त्यांच्यावर कारवाई केली जाईल.

– नितीन धार्मिक, अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क विभाग

वर्षभरातील ‘एक्साईज’ची कारवाई

ढाबे चालकांवर कारवाई

५०

न्यायालयातून दंड

१२.५० लाख

मद्यपींवर कारवाई

१४८

मद्यपींनी भरलेला दंड

अधिक वाचा  पुणे मानाचे गणपती विसर्जन मिरवणुक वेळापत्रक समोर, असा असेल मार्ग? पोलिस आयुक्त अमितेश कुमारांची माहिती

१,३०,५००

दोन लाख जणांकडे मद्यपानाचा परवाना

मद्यपान करताना किंवा पिण्यासाठी खरेदी केलेली दारू नेणाऱ्याकडे परवाना जरुरी आहे. परवाना नसल्यास दोनशे-तीनशे रुपयांच्या दारूसाठी पाच हजारांपर्यंत दंड भरावा लागू शकतो. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील जवळपास ८५ हजार व्यक्तींनी मद्यपानाचा आजीवन परवाना काढून ठेवला आहे. तर एक वर्षासाठी परवाना घेतलेल्या मद्यपींची संख्या जिल्ह्यात सव्वालाखांपर्यंत आहे.