जुन्या गोष्टी विसरू नका, पवारांचा बदला घ्यायची हीच वेळ, यावेळी मला साथ द्या; विजय शिवतारेंची भोरच्या अनंतराव थोपटेंना साद

0

बारामतीच्या राजकारणात आता जलदगतीने वेगवेगळ्या घडामोडी घडताना दिसत आहेत. सुप्रिया सुळे विरूद्ध सुनेत्रा पवार अशी तुल्यबळ लढत होत असल्याने प्रत्येक आमदाराला आणि पदाधिकाऱ्याला महत्त्व प्राप्त झाल्याचं दिसतंय. त्यात आता विजय शिवतारेंनी उडी घेतल्याने ही लढत अधिक रंगणार आहे. काही दिवसांपूर्वी शरद पवारांनी भोरच्या अनंतराव थोपटे यांची भेट घेतली होती. आता विजय शिवतारेनीही त्यांची भेट घेत जुन्या गोष्टी विसरू नका, आता आम्हाला साथ द्या अशी साद घातली आहे.

काही दिवसांपूर्वी शरद पवारांनी 40 वर्षांच्या राजकीय वैर बाजूला ठेवून भोरचे आमदार संग्राम थोपटे यांचे वडील अनंतराव थोपटे यांची भेट घेतली होती. सुप्रिया सुळे यांना लोकसभेच्या निवडणुकीत साथ देण्यासाठीच पवारांनी ही भेट घेतली होती. त्यानंतर झालेल्या बैठकीत संग्राम थोपटे यांनी आपण सुप्रिया सुळे यांनान निवडून देऊ असं सांगितलं होतं.

अधिक वाचा  जैन बोर्डिंग होस्टेल व्यवहाराशी माझा काही संबंध नाही! माहिती न घेता चुकीचे आरोप मोहोळांचा कागदपत्रांसह खुलासा

आता शिवतारेंची साद

बारामतीच्या राजकारणात भोर तालुक्याचं महत्व लक्षात घेता शरद पवारांच्या भेटीनंतर आता विजय शिवतारेंनी अनंतराव थोपटेंची भेट घेतली. त्यावेळी थोपटेंशी बोलताना ते म्हणाले की, पवारांच्या विरोधात असलेल्या मतदारांना मी साथ देणार आहे. हा लोकशाहीतील वाद असल्याने विरोधातील लोकांनाही संधी देणं आवश्यक आहे. शरद पवारांनी 1999 च्या निवडणुकीत तुम्हाला पाडलं होतं. अजित पवारांनी जाहीर सभेत आपली लायकी काढली होती. पुरंदरचे लोक म्हणतात की आम्ही नोटाला मत देऊ, पण पवारांना मत देणार नाही. दुश्मनी राहिली बाजूला, मी यांना माफ केलं, पण जनता माफ करणार नाही. त्यामुळे मी निवडणूक लढवत आहे, मला तुमचा आशीर्वाद हवा आहे.

अधिक वाचा  कोथरूडला ऐन दिवाळीत ‘तात्काळ’ कारवाई धडाका?; भाजपाची एक तक्रार अन् पालिका प्रशासन तडफदार

पुरंदरचं काय? अनंतराव थोपटेंचा प्रश्न

पुरंदरची स्थिती काय असा प्रश्न यावेळी अनंतराव थोपटे यांनी विजय शिवतारे यांना विचारला. त्यावेळी पुरंदर सर्व आपल्या मागे असल्याचं शिवतारेंनी सांगितलं.

संग्राम थोपटेंसाठी सर्वांकडून पायघड्या

भोरचे आमदार संग्राम थोपटे हे लोकसभेच्या निवडणुकीत आपल्या बाजूने रहावेत यासाठी शरद पवार, अजित पवार आणि विजय शिवतारे प्रयत्न करत आहेत. त्यामुळे संग्राम थोपटे आता महाविकास आघाडीधर्म पाळणार, अजित पवारांना साथ देणार की तिसरा पर्याय म्हणून विजय शिवतारेंना साथ देणार हे पाहावं लागेल.