अजितदादा गटाला पहिलं खिंडार, एका ओळीचं पत्र लिहीत नेत्याचा राजीनामा; शरद पवार गटात जाणार ?

0
2

अजित पवार गटाला मोठं खिंडार पडलं आहे. अजित पवार गटातील नेते बजरंग सोनवणे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा राजीनामा दिला आहे. सोनावणे यांनी सुनील तटकरे यांना पत्र लिहून राजीनामा सादर केला आहे. “मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष च्या प्राथमिक सदस्याचा राजीनामा सादर करीत आहे” असा एका ओळीचा मजकूर या पत्रावर लिहिला आहे. तसेच या राजीनाम्याची प्रत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे बीडचे जिल्हाध्यक्ष राजेश्वर चव्हाण यांना देखील सुपूर्द करण्यात आली आहे.

शरद पवार गटात जाणार

दरम्यान अजित पवार गटातून बाहेर पडल्यानंतर आज दुपारी साडेचार वाजता सोनवणे हे शरद पवार गटात प्रवेश करणार आहेत, अशी माहिती मिळत आहे. बीडमधील अनेक कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत ते पक्षप्रवेश करतील.

अधिक वाचा  मराठा समाजानंतर OBC समाजासाठीही उपसमितीची स्थापना; राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय

बजरंग सोनवणे हे गेल्या काही दिवसांपासून शरद पवार यांच्या संपर्कात होते. पुण्यात त्यांनी शरद पवार यांची भेटही घेतली होती. 2019 सालच्या निवडणुकीमध्ये बजरंग सोनवणे यांनी खासदार प्रीतम मुंडे यांच्याविरोधात निवडणूक लढवली होती. त्यावेळेस धनंजय मुंडे हे सोनवणे यांच्यासोबत होते. मात्र आता महायुतीमधील सगळी चित्रं बदलल्याचं दिसत आहे. आता पंकजा मुंडे यांना बीडमधून उमेदवारी देण्यात आली आहे. पंकजा मुंडे यांना जिंकून देण्याचं आश्वासन हे त्यांचे बंधू धनंजय मुंडे यांनी दिलं आहे. त्यामुळे बजरंग सोनवणे हे कुठेतरी नाराज होते. आणि त्यांची हीच नाराजी पक्षबदलासाठी कारणीभूत ठरल्याचं दिसत आहे. अखेरीस ते अजित पवार गट सोडून आता शरद पवार गटात प्रवेश करणार आहेत.

अधिक वाचा  रुणवाल पॅनोरमा सोसायटीत श्रीचरणी कामगार कवी राजेंद्र वाघ यांच्या कविता सादर